जळगावातील अमृत योजनेचा आज पंतप्रधानांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 12:34 PM2017-04-26T12:34:04+5:302017-04-26T12:34:04+5:30
जळगाव महापालिकेसाठी मंजूर करण्यात आलेल्या अमृत योजनेच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा बुधवारी पंतप्रधान घेणार आहेत.
Next
जळगाव,दि.26- मनपाची अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना 11 महिन्यांपूर्वी प्रशासकीय मंजुरी मिळूनही रखडली असल्याने रखडलेल्या प्रकल्पांच्या यादीत जळगावच्या योजनेचाही केंद्र शासनाने समावेश केला असून बुधवार, 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याबाबत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याच्या सचिवांकडून आढावा घेणार आहेत.
मनपाच्या अमृत योजनेला 23 जून 2016 रोजी शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली. मात्र त्यानंतर 11 महिने उलटूनही या योजनेच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ होऊ शकलेला नाही. केंद्रशासन विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याची ही योजना असल्याने त्यांच्याकडून याविषयी सातत्याने माहिती घेतली जाते. मात्र जळगावसह काही ठिकाणच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळून बराच कालावधी उलटूनही त्यांचे काम सुरू होऊ शकलेले नाही. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या अधिका:यांनी अशा रखडलेल्या योजनांची यादी तयार केली आहे. त्यात जळगावच्या योजनेचाही समावेश आहे. या रखडलेल्या योजनांचा आढावा बुधवार, 26 रोजी पंतप्रधान मोदी घेणार आहेत. व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक राज्याच्या सचिवांकडून ते याबाबत माहिती घेणार आहेत.