आमदार किशोर पाटील यांनी घेतली आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:49+5:302021-09-26T04:17:49+5:30
अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती आहे. कोकणच्या धर्तीवर आपल्याकडील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी ...
अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती आहे. कोकणच्या धर्तीवर आपल्याकडील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील पंधरवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुका व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, रस्ते, पूल, बंधारे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक प्रांताधिकारी दालनात घेतली.
यावेळी नगरदेवळा पूल, कजगाव पूल, नेरी घुसर्दी, दिघी खाजोळा, कजगाव, वडगाव मुलाने, बाळद, सामनेर, नांद्रा आदी ठिकाणी झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यांचा आढावा घेत कोणीही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, दोन्ही तालुक्यांचे कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी तसेच जलसंधारण, जलसंपदा, जिल्हा परिषद, महावितरण, वन विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, डॉ. विशाल पाटील, बाजार समिती प्रशासक युवराज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे आदी उपस्थित होते.