सिव्हील हॉस्पिटल नॉन कोविड करण्यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:40 PM2020-06-30T12:40:04+5:302020-06-30T12:40:28+5:30
गोदावरीला पूर्णत: कोविड करण्याच्या हालचाली
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सद्यस्थितीत डेडिकेटेट कोविड हॉस्पीटल आहे, मात्र, नॉन कोविड रुग्णांचे होणारे हाल बघता आगामी पंधरा दिवसात कोविड रुग्णवाढीचा आढावा घेऊन या ठिकाणी नॉन कोविड रुग्णांची व्यवस्था करण्यात येईल व गोदावरी रुग्णालयास संपूर्ण कोविड रुग्ण करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ हा निर्णय आढावा घेतल्यानंतरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़
हॉटेलमध्येही आयसोलेशनची 'पेड' व्यवस्था
ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत व ज्यांना शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचे नाहीत, अशांसाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्ये उपचार व आयसोलेशनची व्यवस्था करता येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून डॉक्टर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
रुग्णालयांवरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले़ यासह बाधित रुग्णांसाठी होम आयसोलेशनच्या व्यवस्थेसंदर्भातही वरिष्ठ पातळीवर बोलून निर्णय घेऊ, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़