‘वरखेडे लोंढे’ला ५२६ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 07:07 PM2018-03-13T19:07:45+5:302018-03-13T19:07:45+5:30
खर्चात २९० कोटींची वाढ
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावापासून दीड किमी अंतरावर गिरणा नदीवर प्रस्तावित ‘वरखेडे लोंढे’ (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात २९०.६३ कोटींनी वाढ करीत एकूण ५२६ कोटी ६४ लाखांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या व्यय अग्रक्रम समितीने दोन दिवसांपूर्वीच दिली असून त्याआधारे सोमवारी, केंद्रीय जल आयोगाने या प्रकल्पाला तांत्रीक व आर्थिक मंजुरी (टेक्नीकल अॅण्ड इकॉनॉमिकल क्लिअरन्स) दिली.
३१ गावांच्या ७५४२ हेक्टरचे सिंचन
चाळीसगाव शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर गिरणा नदीवर प्रस्तावित या प्रकल्पात एकूण ३५.३८ दलघमी (१.२६ टीएमसी) पाणी होणार आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील २० गावांचे ५१०० हेक्टर व भडगाव तालुक्यातील ११ गावांचे २४४२ हेक्टर असे एकूण ३१ गावांचे ७५४२ हेक्टर सिंचन क्षेत्र ३८ किमी लांबीच्या कालव्याद्वारे सिंचीत होणार आहे.
१९९९ पासून रखडलाय प्रकल्प
या प्रकल्पाला १९९७-९८च्या दरसुचीनुसार ७५.६४ कोटींच्या खर्चासह मूळ प्रशासकीय मान्यता १ मार्च १९९९ रोजी देण्यात आली होती. त्यानंतर २००७-०८ च्या दरसुचीनुसार या खर्चात वाढ होऊन २३६.०२ कोटी झाली. त्यास प्रथम सुधारीत मान्यता १८ फेब्रुवारी २००९ रोजी देण्यात आली. मात्र भूसंपादनापासून सर्वच काम रखडल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे २०१४-१५ च्या दरसुचीनुसार आता त्यात सुमारे २९०.६३ कोटींच्या वाढीसह ५२६.६४ कोटीच्या अंदाजपत्रकास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जलसंपदामंत्र्यांचा पुढाकार
अनेक वर्षांपासून रखडलेला वरखेडे लोंढे तसेच शेळगाव बॅरेज हे दोन प्रकल्प डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याचे प्रयत्न जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरू ठेवले आहेत. त्यामुळेच ९ मार्च २०१८ रोजी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या उपस्थितीत झालेल्या शासनाच्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत गिरीश महाजन यांनी या धरणाच्या सुधारीत प्रशासकीय मंजुरीचा विषय लावून मंजुरी मिळवल्याचे समजते.
केंद्रीय जल आयोगाचा हिरवा कंदील
राज्य शासनाची सुधारीत प्रशासकीय मंजुरी मिळताच तातडीने सोमवार, १२ मार्च रोजी केंद्रीय जलआयोगाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. त्यात आयोगाने या प्रकल्पाना तांत्रीक व आर्थिक मंजुरी (टेक्नीकल अॅण्ड इकॉनॉमिकल क्लिअरन्स) दिली आहे.
डिसेंबरअखेर प्रकल्प पूर्ण करणार
या प्रकल्पासाठी कोणतेही पुनर्वसन नाही. मुख्य धरणाचे कामे २०१३ पासून सुरू आहे. त्यात डाव्या तिरावरील मातीकाम ७० टक्के पूर्ण झाले असून उजव्या तीराचे खोदकाम पूर्ण झाले आहे. सांडव्याचे काम सुरू असून या प्रकल्पावर आॅक्टोबर २०१७ अखेर ६९.९४ कोटी रूपये खर्च झाला आहे. आता या प्रकल्पाचे उर्वरीत काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
----------
बळीराजा जल संजीवनी योजनेत जिल्ह्यातील दोन प्रकल्प
केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत जिल्ह्यातील वरखेडे लोंढे व शेळगाव बॅरेज या दोन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांना आता केंद्राचा किमान २५ टक्के निधी मिळू शकतो. त्यामुळे या धरणांचे काम तातडीने मार्गी लागणार आहे.