जिल्ह्यातील तीन सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:59+5:302021-01-15T04:13:59+5:30
जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा -१, (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर ...
जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा -१, (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
उर्ध्व तापी टप्पा-१, (हतनूर प्रकल्प), या सिंचन प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ५३६.०१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. तसेच शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ९६८.९७ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजनेच्या प्रकल्पास पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ८६१.११ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.