जळगावातील ५४२ शिक्षकांना बदलीचे सुधारित आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:11 PM2018-05-30T13:11:26+5:302018-05-30T13:11:26+5:30
विस्थापित शिक्षकांमध्ये संभ्रम
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३० - जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमधील घोळानंतर शिक्षकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत एनआयसीने जिल्ह्यातील ५४२ शिक्षकांना पुन्हा सुधारित आदेश दिले आहेत. मात्र या सुधारित आदेशातही अनेक घोळ असल्याने बदली प्रक्रियेत विस्थापित झालेले शिक्षक पुन्हा संभ्रमात आहे.
शिक्षकांच्या बदल्यानंतर झालेल्या शिक्षकांचा विरोध लक्षात घेता एनआयसी (पुणे) कार्यालयाने विस्थापीत व गैरसोयीच्या ठरलेल्या ५४२ शिक्षकांना पुन्हा सुधारित आदेश दिलेले आहेत. यात ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांची बदली रद्द करुन पु्न्हा अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. यासह काहींना नवीन आॅर्डर देण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना या शाळेतुन त्या शाळेत अशी पायपीट करावी लागणार आहे.
या सुधारित आदेशात फार सुधारणा न करता विस्थापितांना न्याय देण्यात आलेला नसल्याच्या तक्रारी शिक्षकांमधून केल्या जात आहेत. तसेच काही सोयीच्या ठिकाणी गेलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना पुन्हा अर्ज भरण्याचे सांगण्यात आले आहे.