जळगाव जिल्ह्यातील 370 गावांची सुधारीत हंगामी पैसेवारी 50 पैशांच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:07 PM2017-11-02T13:07:34+5:302017-11-02T13:07:49+5:30
तीन तालुक्यातील सर्व गावे 50 पैशांच्या आत : उर्वरित 1132 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यातील 1502 गावांची सुधारीत हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यात 370 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तर 1132 गावांची पैसेवारी 50पैशांच्या वर आहे.
यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळा झाला. याउलट जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यानुसार यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी प्रशासनाने नजर पैसेवारी जाहीर केली होती. त्यात 1467 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर होती तर उर्वरित गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत होती.
तीन तालुक्यातील सर्व गावे 50 पैशांच्या आत
31 ऑक्टोबर रोजी प्रशासनाने खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर केली. त्यात अमळनेर तालुक्यातील 154 पैकी 154, मुक्ताईनगर तालुक्यातील 81 पैकी 81, बोदवड तालुक्यातील 51 पैकी 51 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत आहे. पारोळा तालुक्यातील 114 पैकी 35, यावल 84 पैकी 3, चाळीसगाव तालुक्यातील 136 पैकी 46 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत आहे.
सात तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्यावर
सात तालुक्यांधील सर्वचे सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्यावर आहे. यामध्ये जळगाव तालुक्यातील 92, जामनेर तालुक्यातील 152, भुसावळ 54, रावेर 121, पाचोरा 129, चोपडा तालुक्यातील 117 गावांमधील पैसेवारी 50 पैशांच्यावर आहे. पारोळा तालुक्यातील 79, यावल 81, भडगाव 63, चाळीसगाव तालुक्यातील 90 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर आहे.