रावलांची परिक्रमा आणि महाजनांचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 05:11 PM2018-04-16T17:11:02+5:302018-04-16T17:11:02+5:30
शिंदखेड्याचे जयकुमार रावल व जामनेरचे गिरीश महाजन यांनी नियोजनपूर्वक मतदारसंघ जोडला आहे. पाच दिवसात ५२ कि.मी.ची परिक्रमा असो की, लेझीम घेऊन मिरवणुकीत नृत्य असो हे दोन्ही नेते जनतेशी नाळ जोडून ठेवतात. हेच यशाचे गमक आहे.
सलग २५ वर्षे आमदार म्हणून निवडून येत असताना पहिल्यांदा मिळालेले मंत्रिपद डोक्यात जाऊ न दिलेले गिरीश महाजन हे अजूनही सामान्यांना आपलेसे वाटतात. जयकुमार रावलांनी आमदारकीची हॅटट्रीक साधली. मंत्रिपद थोडे उशिरा मिळाले. पण दोघांच्या कामाचा झपाटा अफाट. त्याचा परिणाम दिसून आला. जामनेर तालुक्यातील सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात आल्या. तीच स्थिती शिंदखेडा तालुक्यात झाली. दोंडाईचा, शिंदखेडा पालिका रावलांनी विरोधकांकडून खेचून घेतल्या. जनतेचा विश्वास जिंकला. दोन्ही मंत्र्यांच्या यशाचे गणित असे आहे. अर्थात विरोधकांसोबत स्वकीयांचा विरोध दोघांना सहन करावा लागतो आहेच.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. बुराई नदी ही तालुक्याची जीवनवाहिनी. तिला बारमाही करण्याचा संकल्प हाती घेऊन रावल यांनी पाच दिवसांची परिक्रमा केली. २० कोटी रुपयांच्या २४ साठवण बंधाऱ्यांचे भूमिपूजन त्यांनी केले. पावसाळ्यापूर्वी म्हणजे तीन महिन्यात हे बंधारे पूर्ण व्हावेत, असे नियोजन केले आहे. या परिक्रमेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क व संवाद साधला. जनता दरबार घेऊन प्रश्न समजून व सोडविण्याला प्राधान्य दिले. जनतेची आपुलकी मिळविली.
मोदींची सूचना आणि...
लोकप्रतिनिधीने मतदारसंघात जाऊन सरकारने केलेल्या कामांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामूहिक स्वरुपात दूरध्वनी करुन भाजपाच्या खासदार-आमदारांना केली. जयकुमार रावल हे राज्यातील पहिले लोकप्रतिनिधी असतील, की त्यांनी दूरध्वनी येण्यापूर्वीच पंतप्रधानांना अपेक्षित असलेली कार्यवाही सुरु केलेली आहे.
जामनेर पालिका निवडणुकीचा निकाल आणि बुराई नदी परिक्रमा हे तसे भिन्न विषय आहेत, पण त्यात साम्यस्थळे अनेक आहेत. मतदारसंघातील संपर्क आणि मतदारांशी संवाद यासाठी परिक्रमा ही पायरी आहे. तर निवडणुकीतील विजय हा कळस आहे. गिरीश महाजन आणि जयकुमार रावल हे दोन्ही मंत्री लोकसंपर्क, विकास कामे, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी आणि विरोधकांचे प्रमुख लक्ष्य म्हणून नेहमी चर्चेत असतात.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे महिनाभरात दुसºयांदा जामनेरला येऊन सभा घेतात आणि तरीही महाजन त्यांच्यावर मात करुन राष्टÑवादीच्या नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना पराभूत करतात, ही त्यांच्या कामाची, रणनितीची पावती आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र आले तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होऊ शकतो, याविषयी देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमत होऊ घातले असताना जामनेरचा निकाल या निष्कर्षाला छेद देणारा ठरला आहे.
मंत्रिपद आणि विजय कधीही डोक्यात न जाऊ देणाºया गिरीश महाजन यांनी पालिका निवडणुकीतील विजयानंतरही संयत आणि संयमी अशी प्रतिक्रिया नोंदविली. याउलट समर्थक किती अतिउत्साही, उथळ असतात हे ‘जामनेर तो झाँकी है, जलगाँव अब बाकी है!’ या घोषणेवरुन दिसून आले. जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा संदर्भ या घोषणेमागे आहे. पण जळगाव आणि जामनेरचे राजकीय नेतृत्व, स्थिती, प्रश्न, आव्हाने या बाबी विषम आहेत. निवडणुका चार महिन्यांवर आल्या तरी त्याचे नेतृत्व कोणी करावे, याविषयी भाजपामध्ये एकमत नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, विधान परिषद सदस्य स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी असे ८ नेते नेतृत्व करण्याच्या योग्यतेचे आहेत. परंतु हे सारे एकत्र येऊन सामूहिक नेतृत्वाची संकल्पना स्विकारतील काय, त्यांचे गट-तट असा निर्णय मानतील काय हा खरा प्रश्न आहे. ईशान्येकडील राज्यांमधील भाजपाच्या विजयाचा आनंदोत्सव मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकात साजरा होतो, पण जामनेरमधील यशाबद्दल एक फटाका तिथे फुटला नाही, याचे आश्चर्य व्यक्त करायचे की, जामनेरच्या विजयाचा आनंद साजरा करणाºया जाहिरातींमध्ये खडसेंचा फोटो टाळला जातो, यावरुन खंत व्यक्त करायची याविषयी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. गटा-तटातील असा ‘सौहार्द’ पाहता भाजपा एकदिलाने, एकमताने कसा निवडणुकीला सामोरा जाणार आहे, हा प्रश्न आहेच.
जामनेरात महाजन हे विरोधकांसोबत स्वकीयांच्या कारवायांना पुरुन उरले. ‘अदृष्य हाता’च्या भरवशावर राहिलेल्या ‘हात’ आणि त्यावरील ‘घड्याळ’ दोन्ही जामनेरात निरुपयोगी ठरले. हे या विजयाचे वैशिष्टय आहे.
अशीच स्थिती जयकुमार रावल यांची आहे. दोंडाईचा आणि शिंदखेडा पालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्टÑवादीला नामोहरम करीत भाजपाचा झेंडा फडकविला. परंतु विखरणच्या धर्मा पाटील या वृध्द शेतकºयाने मंत्रालयात केलेल्या आत्महत्येनंतर मोठे राजकीय वादळ उठले. भूसंपादनाचा विषय घेऊन रावल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. राष्टÑवादीचे नेते नबाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनी खळबळ माजवली आणि पोलीस स्टेशनपर्यंत बदनामीच्या फिर्यादी पोहोचल्या. स्वकीयांनीही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोंडाईचा येथील बालिका बलात्कार प्रकरण उघडकीस आले. त्यात संस्थाचालक म्हणून माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांनी पीडितेच्या पालकांवर दबाव आणल्याची फिर्याद नोंदविली गेली. पुढे हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला. अशा राजकीय अस्वस्थतेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जयकुमार रावल यांनी बुराई नदी परिक्रमा करुन विकासाच्या राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.
तापी नदीवर प्रकाशा व सारंगखेडा याठिकाणी बंधारे बांधल्याने ती बारमाही झाली. बागायती क्षेत्र वाढले. शेतकºयांचे जीवनमान सुधारले. शिरपुरात अमरीशभाई पटेल, सुरेश खानापूरकर यांच्या बंधाºयांच्या चळवळीमुळे काही भागात शेतकरी वर्षातून तीन पिके घेऊ लागली. जलपातळी उंचावली. याच धर्तीवर बुराई नदीवर माथा ते पायथा या तत्त्वाने सुमारे ३४ बंधारे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २० कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे बंधारे पूर्ण झाल्यास शिंदखेडा शहरासह तालुक्यातील ३५ ते ४० गावांना लाभ होणार आहे. सहा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या परिक्रमेत जलसंवर्धन जनजागृृतीसाठी पथनाट्य, गाणी अशी माध्यमे वापरण्यात आली. बुराईचे पाणी कलशात ठेवून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण ५२ कि.मी.च्या परिक्रमेत पालखी अग्रस्थानी होती. मुक्कामाच्या ठिकाणी रावल हे जनतादरबार घेत असत. त्याठिकाणी महसूल, सिंचन, कृषी, आरोग्य व पोलीस विभागातील प्रश्न ग्रामस्थ मांडत आणि संबंधित खात्याचे अधिकारी त्याचे निराकरण करीत असत. जनजागृतीच्यादृष्टीने हा अभिनव असा उपक्रम रावल यांनी घेतला आणि त्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.
मिलिंद कुलकर्णी