वाढीव हमी भावाची घोषणा होताच तांदळात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:48 PM2019-12-22T23:48:34+5:302019-12-22T23:49:18+5:30

दोन दिवसात निर्यातही सुरू होण्याची शक्यता

Rice boom as soon as the extended guarantee price is announced | वाढीव हमी भावाची घोषणा होताच तांदळात तेजी

वाढीव हमी भावाची घोषणा होताच तांदळात तेजी

Next

जळगाव : इराणमध्ये निर्यात थांबलेल्या व अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात आवक वाढलेल्या तांदळाला वाढीव हमी भाव देण्याची घोषणा होताच तांदळाच्या भावात तेजी सुरू झाली आहे. सर्वच प्रकारच्या तांदळाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्लिंटलने वधारले असून दोन दिवसात निर्यात सुरू होण्याची शक्यता असल्याने भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून दिले जात आहे. विशेष म्हणजे वाढीव हमी भावाची घोषणा होताच तांदूळ मिलमालकांनी माल विक्रीतही हात आखडता घेतला आहे.
यंदा झालेल्या अतिपावसामुळे इतर पिकांना फटका बसला असला तरी तांदळाला फायदा झाला. तांदळाच्या पिकाला सलग १०० दिवस पाणी लागते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या खंडामुळे तांदळाच्या आवकवर व दर्जावरही परिणाम होत असे. मात्र यंदा चांगल्या पावसामुळे तांदळाची बंपर आवक झाली आहे.
आवक जास्त असली तरी भारतातून इराणमध्ये होणारी तांदळाची निर्यात थांबलेली आहे. भारतातून इराण, नेपाळ, मलेशिया, दुबई, अफ्रिका देश या भागात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते. या निर्यात होणाºया तांदळापैकी ५० टक्के (दरवर्षी तब्बल ८ ते १० लाख टन) तांदळाची निर्यात एकट्या इराणमध्ये होते. भारतीय तांदळाचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या इराणकडून भारताने सध्या कच्च्या तेलाची (क्रूड आॅईल) खरेदी थांबविली आहे. कच्च्या तेलाच्या बदल्यात इराण भारताकडून तांदळाची आयात करतो. मात्र कच्च्या तेलाची खरेदीच होत नसल्याने इराणनेही भारतीय तांदूळ खरेदीला नकार दिला आहे.
या दोन्ही कारणांमुळे तांदळाचा मोठा साठा देशात उपलब्ध झाला आहे. परिणामी आवक वाढल्याने तांदळाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्क्याने खाली आले.

नवीन वर्षापासून मोठी तेजी
गडगडलेल्या तांदळात आता वाढीव हमी भावाच्या घोषणेने तेजीचे चित्र निर्माण झाले आहे. पूर्वी धानचा १८०० रुपये प्रती क्विंटल हमी भाव होता. त्यानंतर महायुती सरकारच्या काळात सरकारने ५०० रुपये प्रती क्विंटल वाढीव भाव दिला. आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी २०० रुपये प्रती क्विंटल वाढीव भाव देण्याची घोषणा केली. त्यामुळे धानचा हमी भाव आता २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला आहे. यामुळे तांदूळ निर्मिती करणाºया मिल मालकांनीही भाववाढीचा निर्णय घेतला. परिणामी तांदळाच्या बाजारात तेजी आली आहे.

निर्यात सुरू होण्याची शक्यता
इराणममध्ये थांबलेली निर्यात २५ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही निर्यात सुरू झाली की तांदळात आणखी तेजी येऊन नवीन वर्षापासून तांदळाचे भाव चांगलेच वधारणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या जळगावच्या बाजारपेठेसह राज्यातही विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसरसह छत्तीसगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, इत्यादी भागातून तांदळाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. मात्र वाढीव हमी भावामुळे मिल मालकांनी हात आखडता घेतल्याने ही आवक काहीसी कमी होऊन भाववाढीत आणखी भर पडू शकते, असेही सांगितले जात आहे.
उत्पादकांना दिलासा
वाढीव हमी भाव देऊन धान उत्पादकांना मंदीतून सावरण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. या वाढीव हमी भावाने तांदळात तेजी येणार असली तरी दुसरीकडे धान उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

इराणमध्ये होणारी तांदळाची निर्यात थांबल्याने व आवकही चांगली असल्याने तांदळाचे भाव २५ ते ३० टक्क्याने गडगडले होते. मात्र धानला वाढीव हमी भाव देण्याची घोषणा झाल्याने तांदळाच्या भावात तेजी आली आहे. नवीन वर्षापासून आणखी भाव वाढू शकतात.
- विनोद बलदवा, तांदूळ व्यापारी.

Web Title: Rice boom as soon as the extended guarantee price is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव