धनदांडग्या ब्लॅकमेलरचे रंगिले कारनामे
By Admin | Published: March 9, 2017 12:55 AM2017-03-09T00:55:19+5:302017-03-09T00:55:19+5:30
विकृत ताब्यात : झटपट श्रीमंतीसाठी मुलींना पाठविले अश्लील फोटो
जळगाव : उच्चभ्रू परिवारातील ओळखीच्या महिला व मुलींना ‘व्हॉटस्अॅप’ वर अश्लील संदेश, फोटो व चित्रफित पाठवून त्यांना ब्लॅकमेल करणाºया भुसावळ येथील जयंत प्रभाकर झांबरे (वय ४२,ह.मु.नाशिक) याच्या कारनाम्यांचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक उपनगर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. झांबरे व फोटो मिक्सिंग करणारा त्याचा साथीदार राकेश गोरख पवार (मुळ रा.नाशिक,ह.मु.ऐरोली, नवी मुंबई) हे दोघंं विकृत नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत.
झांबरे हा मूळचा भुसावळ येथील रहिवाशी आहे. पाच वर्षापूर्वी भुसावळात नामांकित व्यापारी संकुलात त्याचा बीग बाजार होता. त्याशिवाय शेअर मार्केटिंग, मालमत्ता व सोसायटीत त्याची करोडोने गुंतवणूक होती. ही करोडोची उलाढाल होत असताना त्याला व्यवहार व व्यवसायात फटका बसला. नुकसानीमुळे तो कंगाल झाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी नागपूर, अमरावती व नाशिक येथे त्याने वेगवेगळे प्रयत्न करुन पाहिले, मात्र त्यात अपयश आले. ४ वर्षापूर्वी त्याने नाशिक शहर गाठले. झटपट पैसा कमाविण्यासाठी त्याने हा ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला होता.
नवी मुंबईला फोटो मिक्सिंग
झांबरे हा फोटो मिक्सिंगसाठी ऐरोली, नवी मुंबई येथे जायचा. त्याचा मित्र संगणक तज्ज्ञ राकेश गोरख पवार याच्याकडून तो फोटो बनवून ते मुलींना पाठवायचा. तो एका खासगी कंपनीत काम करतो. पवार याला एका प्रकरणात २० हजार रुपये मिळायचे. पोलिसांनी पवारलाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, झांबरे याच्या या विकृतपणामुळे अनेक मुलींचे लग्न संबंध तुटले आहेत. खास करून तो उच्चभू्र घराण्यातील मुली व महिलांनाच लक्ष्य करायचा.
असा अडकला जाळ्यात
झांबरे याने एकाच वेळी नाशिक व भुसावळ येथील मुलींना अश्लील फोटा पाठवून तीन लाखाची मागणी केली. नाशिकच्या तरुणीने उपनगर पोलीस स्टेशनला ११ फेब्रुवारीला तक्रार केली तर भुसावळच्या मुलीच्या पालकाने मागील आठवड्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांची भेट घेऊन हकीकत कथन केली. चंदेल यांनी या कामासाठी विजय पाटील, दिलीप येवले, नरेंद्र वारुळे, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, दिनेश बडगुजर व शरद सुरळकर यांचे पथक तयार केले. या पथकाने १२ तासात त्याची कुंडली काढून तो नाशिक येथे असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार हे पथक नाशिकला रवाना झाले. त्याला ताब्यात घेणार तितक्यात उपनगर पोलिसांनी त्याला उचलले. नाशिकच्या गुन्ह्यात तो सध्या अटकेत आहे.
काय आहे मोडसआॅप्रेंटी
झांबरे याने नातेवाईक, ओळखीच्या मुलींना संदेश पाठवून ब्लॅकमेल केले आहे. त्यात तो सुरुवातीला ‘प्लीज चेक व्हॉटस्अॅप’ असा मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पाठवायचा. संबंधित मुलीने व्हॉटस्अॅप सुरू करताच ‘हाय...रिना (नाव बदल केले आहे) मी भाग्यश्री’ असा संदेश पाठवितो. त्याला ओळखण्यास नकार देताच मुलीचा चेहरा मिक्सिंग केलेला अश्लील फोटो पाठवितो. त्यानंतर पुन्हा व्हीडीओ अपलोड करण्याची धमकी देतो. हा व्हीडीओ व फोटो यू ट्युब तसेच नातेवाईक व मित्र-मैत्रिणींना पाठविण्याची धमकी देतो. विवाहित महिला असली की तिच्या नवºयाला व अविवाहित तरुणी असली की होणाºया नवºयाला हे फोटो पाठविण्याची धमकी देतो.