रिक्षाची बॅटरी, टायर चोरल्याने संताप
By admin | Published: January 8, 2016 12:19 PM2016-01-08T12:19:16+5:302016-01-08T12:20:54+5:30
लुका पोलीस स्टेशनला जमा केलेल्या रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी झाल्याने रिक्षाचालक स्वप्नील पांडुरंग कुळकर्णीने संताप व्यक्त केला.
जळगाव : तालुका पोलीस स्टेशनला जमा केलेल्या रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी झाल्याने रिक्षाचालक स्वप्नील पांडुरंग कुळकर्णी (रा.पाळधी ता.धरणगाव) यांनी संताप व्यक्त केला. रॉकेल अंगावर ओतले, त्याच्याजवळ जमलेल्या नागरिकांनी त्याची समजूत घातली. यानंतर ते शांत झाले.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याच्या प्रकरणात स्वप्नीलला मेमो देऊन वाहन पंधरा दिवसासाठी निलंबित केले होते. आरटीओविभागाने ही कारवाईकेली होती. कारवाईनंतर रिक्षा तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली होती. आरटीओच्या मेमोनुसार स्वप्नील याने गुरुवारी न्यायालयात चार हजार व आरटीओ कार्यालयात दोन हजार दोनशे रुपये भरले. रिक्षा ताब्यात घेण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनला गेला असता तेथे रिक्षाचे एक टायर (स्टेपनी) व बॅटरी चोरी झाल्याचे लक्षात आले.
आरटीओ कार्यालय गाठले
पोलिसांनी हाकलून लावल्यानंतर स्वप्नीलने पंधरा लीटर रॉकेल घेऊन आरटीओ कार्यालय गाठले. तेथे वाहन निरीक्षक सदाशिव वाघ यांना भेटून टायर व बॅटरीची भरपाई देण्याची मागणी केली. वाघ यांनीही ती जबाबदारी आमची नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे संतापात त्याने रॉकेल अंगावर टाकले. लोकांनी धाव घेत त्याच्याजवळून काडी व रॉकेलची कॅन ताब्यात घेतली. या प्रकारानंतर स्वप्नील यांचे वडील पांडुरंग कुळकर्णी यांना बोलावून घेतले. त्यांनीही पोलीस व आरटीओ विरूद्ध संताप व्यक्त केला. माझा मुलगा जिवानीशी गेला असता तर त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला.
पोलीस स्टेशनला रिक्षा लावूनही बॅटरी व टायर चोरी गेलेच कसे, याची भरपाई कोण करणार असा जाब स्वप्नीलने तालुका पोलिसांना विचारला असता त्यांनी जबाबदारी घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तुमच्या आवारातून वस्तू चोरी झाल्याने तुम्हीच भरपाई द्यावी म्हणून चालक अडून बसल्याने पोलिसांनी ही जबाबदारी आरटीओची असल्याचे सांगितले. व्याजाने पैसे काढून मेमोची रक्कम भरली. त्यात रिक्षाचे टायर व बॅटरी चोरी गेल्याचे समजले. या वस्तू घ्यायला पैसे नाहीत. आधीच मेमोची रक्कम भरुन हैराण झालो आहे. आत्मदहन करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही, म्हणून मी हे पाऊल उचलले. मला माझ्या वस्तू मिळाव्यात.
-स्वप्नील कुळकर्णी, रिक्षा चालक