रिक्षा चालक व त्याच्या मित्राकडून तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 09:53 PM2019-11-25T21:53:10+5:302019-11-25T21:53:24+5:30
एकाला अटक : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर पुन्हा तेच कृत्य
जळगाव : शहरातील एक रिक्षा चालक व त्याच्या मित्राने १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला रिक्षातून फिरवून तिच्यावर रिक्षातच आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकाश सुरेश नागपुरे (२२, रा.अशोक किराणाजवळ, रामेश्वर कॉलनी) याला रविवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याचा गणेश नावाचा साथीदार फरार झाला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी व रिक्षा चालक गणेश तसेच त्याचा मित्र प्रकाश हे तिघं दहा वर्षापासून एकमेकांना ओळखतात. रविवारी दुपारी गणेश याने पीडित तरुणीच्या वडीलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तरुणीला घराबाहेर बोलावले. एकमेकांना ओळखत असल्याने तरुणीच्या वडीलांनीही बाहेर जायला परवानगी दिली. त्यानंतर गणेश व प्रकाश या दोघांनी कुसुंबा गो शाळेत फिरायला जायचं असल्याचे सांगून रिक्षात बसवून तेथे नेले.प्रकाश हा रिक्षा चालवत होता तर गणेश व तरुणी दोघं मागे बसले होते. कुसुंबा गो शाळेत एक तास थांबल्यानंतर तिघं तेथून अयोध्या नगराकडे एका शेतात रिक्षा घेऊन गेले. दोघंही रिक्षातून उतरल्यानंतर आपसात काही तरी बोलले, त्यानंतर गणेश याने तु माझी गर्लफ्रेंड आहे, तू मला खूप आवडते, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणत रिक्षातच तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर प्रकाश याने परत यानेही जबरदस्तीने तरुणीवर अत्याचार केला. यावेळी त्याला नकार देत असताना मोठमोठ्याने तरुणीने आरडाओरड केली, मात्र जवळपास कोणीच नसल्याचे उपयोग झाला नाही. हा प्रकार झाल्यानंतर दोघांनी तरुणीला परत घरी नेऊन सोडले. घरी गेल्यावर पीडितेने झाल्याप्रकाराची माहिती आई, वडीलांना दिली.
गुन्हा दाखल होताच एक फरार
पीडित तरुणी व तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली, मात्र महिला अधिकारी नसल्याने तक्रारीस बराच विलंब झाला.स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक नीता कायटे यांनी फिर्याद घेतल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता गणेश व प्रकाश या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.दरम्यान, पोलिसात तक्रार दिल्याची कुणकुण लागताच गणेश हा फरार झाला तर उपनिरीक्षक विशाल वाठोरे, विशाल सोनवणे, सचिन मुंडे, गोविंदा पाटील व भूषण सोनार यांच्या पथकाने रात्री दोन वाजता प्रकाश नागपुरे याला अटक केली. सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बलात्काराचा दुसरा गुन्हा
प्रकाश नागपुरे याच्याविरुध्द याआधी देखील बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला नुकतान जामीन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जामीनावर असताना त्याने पुन्हा तोच गुन्हा केला. आता बलात्कारासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे करीत आहेत.