दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जळगावात रिक्षा चालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:58 PM2018-11-10T12:58:12+5:302018-11-10T12:59:20+5:30
रेल्वे स्टेशन परिसरात थरार
जळगाव : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून इस्माईल शहा गुलाब शहा (वय ३६, रा.गेंदालाल मील, जळगाव) या रिक्षा चालकाचा दुसऱ्या रिक्षा चालकाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता रेल्वे स्टेशनजवळील रिक्षा थांब्याजवळ घडली. हल्लेखोर रिक्षा चालक नितीन जगन पाटील उर्फ पपई (रा.आव्हाणे, ता.जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इस्माईल शहा व नितीन हे दोन्ही जण रिक्षा चालक आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील थांब्यावर ते रिक्षा लावतात. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नितीन याने इस्माईल याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले, ते दिले नाही म्हणून नितीन याने रागात इस्माईल याच्या पोटात चाकू खुपसला. या थराराक घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरात पळापळ झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठा भाऊ लतीफ शहा व अन्य नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इस्माईल याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी इस्माईल याला मृत घोषीत केले. दरम्यान, भाऊ लतीफ शहा गुलाब शहा (रा.मास्टर कॉलनी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन नितीन उर्फ पपई याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोलाणी मार्केटमधून केली अटक
खून केल्यानंतर फरार झालेल्या नितीन याला रात्री गोलाणी मार्केट परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे व गुन्हे पथक हल्लेखोराच्या शोधार्थ लागले होते. रात्री आठ वाजता या पथकाला यश आले. दरम्यान, या गुन्ह्यात कट रचल्याच्या कारणावरुन आरोपी वाढण्याची शक्यता आहे.