पोलीस स्टेशनवर रिक्षा मोर्चा, आश्वासनानंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:44+5:302021-07-20T04:13:44+5:30
अमळनेर : भाडे ठरवण्याच्या कारणावरून तिघांनी रात्री बसस्थानकावरील रिक्षा चालकांशी वाद घालून रिक्षाची तोडफोड केल्याच्या कारणावरून रिक्षा बंद आंदोलन ...
अमळनेर : भाडे ठरवण्याच्या कारणावरून तिघांनी रात्री बसस्थानकावरील रिक्षा चालकांशी वाद घालून रिक्षाची तोडफोड केल्याच्या कारणावरून रिक्षा बंद आंदोलन करून पोलीस स्टेशनवर रिक्षा मोर्चा नेण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
१९ रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास योगेश गजानन सोनवणे, उमेश गजानन सोनवणे व गौरव गणेश परदेशी यांनी तिघांनी भाडे ठरवण्याच्या कारणावरून कैलास माळी यांच्याशी वाद घालून रिक्षा (एमएच१९/सीडब्ल्यू१५२९) हिच्यावर दगड मारून तोडफोड केली. तसेच ७ ते ८ जण जमा करून रिक्षाची किल्ली हिसकावून रिक्षा स्वामी समर्थ मंदिराकडे नेऊन जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्काळ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हेडकॉन्स्टेबल भरत ईशी याना पाठवल्याने रिक्षा वाचवण्यात आली.
दुसऱ्या दिवशी सर्व रिक्षा चालकांनी रिक्षा बंद आंदोलन पुकारले होते. तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी त्यांनी रिक्षा मोर्चा पोलीस स्टेशनवर आणला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, टॅक्सी युनियन अध्यक्ष बंडू केळकर, रिक्षा युनियनचे अध्यक्ष कैलास माळी यांच्याशी चर्चा करून आरोपीना शिक्षा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद आंदोलन मागे घेऊन मोर्चा माघारी फिरला.