‘आरटीओ’विरुद्ध रिक्षाचालकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:04 PM2019-12-06T22:04:13+5:302019-12-06T22:04:20+5:30
सप्ताहभर करणार आंदोलने
भुसावळ : रिक्षाचालकांना लहान लहान कारणावरून आरटीओ कडून त्रास देण्यात येत आहे. याविरुद्ध जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात जुन्या नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये रिक्षा चालक-मालक संघटनेची बैठक घेण्यात आली व आरटीओ विरोधात निदर्शने करण्यात आले.
शहरातील रीक्षा चालकांना किरकोळ कारणांवरून आरटीओ विभागाकडून मेमो दिले जात असल्याने रीक्षा चालकांनी साप्ताहिक आंदोलनाची घोषणा केली आहे. ७ ते २५ डिसेंबर दरम्यान विविध आंदोलनाचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या समस्यांची दखल घ्यावी, तसेच किरकोळ कारणावरुन त्रास देणे थांबविण्या यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
उपोषणासह करणार
विविध आंदोलन
शनिवार, ७ रोजी सकाळी दहा वाजता जुन्या नगरपालिकेतून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, १० डिसेंबर रोजी भुसावळ ते जळगाव आरटीओ विभाग कार्यालयावर रिक्षा चेतावनी मोर्चा सकाळी दहा वाजता निघेल. १३ डिसेंबर रोजी आरटीओ कार्यालयासमोर सकाळी १३ वाजता बेमुदत उपोषण,१६ डिसेंबर रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर दादर -गोरखपूर एक्सप्रेससमोर रेल रोको आंदोलन, १९ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता गांधी पुतळा भुसावळ येथे जेलभरो आंदोलन, २१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर रीक्षा हॉर्न बजाओ आंदोलन तर २४ डिसेंबर रोजी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर दुपारी १२ वाजता रीक्षा चालक-मालक परिवाराचे अत्याचार बंद करो सामूहिक मुंडण आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनांचे नियोजन गुरुवारी करून आरटीओ विभागाच्या कारभाराविरुध्द रिक्षा चालक मालक संघटनेने निदर्शने केली.