जोडधंदा किंवा नोकरी केली, तरच रिक्षाचालकांना मिळते पोटभर जेवण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:16 AM2021-02-14T04:16:05+5:302021-02-14T04:16:05+5:30
दिवसभरात रिक्षाचा पाचशे ते सहाशे रुपयांचा व्यवसाय होतो, त्यात अडीचशे ते तीनशे रुपयांचे पेट्रोल लागते. त्यामुळे हातात अगदी किरकोळ ...
दिवसभरात रिक्षाचा पाचशे ते सहाशे रुपयांचा व्यवसाय होतो, त्यात अडीचशे ते तीनशे रुपयांचे पेट्रोल लागते. त्यामुळे हातात अगदी किरकोळ रक्कम येते. या रकमेत घरखर्च, मुलांचे शिक्षण, दवाखाना, घरभाडे आदी भागवताना मोठी कसरत होते. रिक्षा व्यवसायावर जास्त अपेक्षाच ठेवता येत नाही. शिक्षण आणि दवाखाना इतका महाग झाला आहे की, ते सामान्य व्यक्तींच्या आवाक्याच्या बाहेर आहे. वडील व भावाचे निधन झालेले आहे. दोन मुले, पत्नी व आई, असा परिवार रिक्षा व्यवसायावर अवलंबून होता. मात्र, आता पेट्रोलचे दर वाढल्याने रिक्षावर भागत नाही. त्यामुळे दिवसा संतोष नेटके यांच्याकडे खासगी ट्रॅव्हल्सबसवर कंडक्टर म्हणून काम करतो व रात्री रिक्षा व्यवसाय करीत असल्याचे सुभाष शिवाजी पाटील या रिक्षाचालकाने व्यवसायाचे चित्र समोर मांडले.
सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे जितक्या अंतराला एक लिटर पेट्रोल लागायचे तितक्याच अंतराला आता दीड लिटर पेट्रोल लागते. त्याशिवाय वाहनांचे मेंटेनन्सदेखील वाढले आहे. त्यामुळे आधीच दरवाढीचा फटका आणि त्यात हा रस्त्यांचा फटका बसू लागला आहे. शहराची हद्द अगदीच मर्यादित असल्याने फारसे भाडेही मिळत नाही. मोठ्या शहरांमध्ये हद्द मोठी असल्याने मीटर पद्धत लागू आहे. तेथे काही अंशी दोन पैसे बरे मिळतात, जळगावात मात्र ते शक्य नाही, असेही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर (प्रतिलिटर)
महिना पेट्रोल डिझेल
डिसेंबर- ९०.९३ ७९.०३
जानेवारी- ९१.२८ ८०.५१
फेब्रुवारी- ९४.०६ ८०.५१
जिल्ह्यातील एकूण रिक्षा- ६,२१६
पेट्रोल रिक्षा- ५,७६९
डिझेल रिक्षा- ४४७
एलपीजी रिक्षा- ००