सोशल मिडियावर टाकलेल्या गाण्यावरून दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 08:12 PM2019-08-10T20:12:02+5:302019-08-10T20:12:45+5:30
रावेर तालुक्यातील रसलपूरची घटना : ११ जणांना अटक
रावेर : तालूक्यातील रसलपूर येथील गजेंद्र काशिनाथ शहाणे याने सोशेल मिडियावर धार्मिक भावना दुखावणारे गाणे टाकल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होवून त्यास अटक व सुटका झाल्यानंतर सायंकाळी शेख नुरा शेख कलाम याच्यासह १५ जणांच्या जमावाने शहाणे याच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात घराच्या खिडक्या व दरवाजे तोडून घरात असलेल्या त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. गुरूवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी शुक्रवारी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण होऊन मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.
सदर पिडीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व मंगळसूत्र ओढाताणीत तोडून, सर्वांना घराबाहेर काढून जिवंत जाळून मारून टाका.. चिनावलचा इरफान शेठ सर्व काही पाहून घेईन.. भिऊ नका.. अशी धमकी व चिथावणी देवून घरावर दगडफेक केल्याचा प्रकार रसलपूर गावात घडला. दरम्यान, फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर पोलिसांची कुमक, शीघ्र कृती दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी वेळीच घटनास्थळी पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवून दाखल गुन्ह्यातील ११ आरोपींना अटक केली आहे.
या संदर्भात सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रसलपूर येथील गजेंद्र काशिनाथ शहाणे यांनी सोशल मिडियावर धार्मिक भावना दुखावतील अशा गाण्याची आॅडियो क्लिप व्हायरल केल्याने, चिनावल येथील इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीला गुरूवारी रात्री अटक करून रावेर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याची पोलिसांनी सुटका केली होती.
घरी परतल्यावर आला जमाव
शहाणे हे सायंकाळी घरी परतल्यानंतर शेख नुरा शेख कलाम याने त्याचे साथीदाराहसह शहाणे याच्या घरावर हल्ला चढविला. शेख नुरा शेख कलाम याने त्याचे साथीदारांसह गजेंद्र शहाणे यांच्या घरात धुडघूस करताना धमक्या देत त्यांच्या पत्नीचा विनयभंग करत सोन्याची चेनही ओढून नेली असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही जमावाने तोडफोड केली. ८ रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दंगा नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यासंबंधी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून रसलपूर गावात तणावपूर्ण शांतता आहे.