दंगेखोरांची नशिराबादमध्ये रात्रभर धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:32+5:302021-07-05T04:12:32+5:30

नशिराबाद/ जळगाव : नशिराबाद ये‌थे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर रात्रभर पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. त्यात मुस्ताक शेख ...

Riots arrested overnight in Nasirabad | दंगेखोरांची नशिराबादमध्ये रात्रभर धरपकड

दंगेखोरांची नशिराबादमध्ये रात्रभर धरपकड

Next

नशिराबाद/ जळगाव : नशिराबाद ये‌थे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर रात्रभर पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. त्यात मुस्ताक शेख मुसा कुरेशी, शेख अनिस शेख हसन, साजीदखान दाऊदखान, जुबरेखान सलीमखान व नूर मोहम्मद शेख मुस्ताक या पाच जणांना अटक करण्यात आली असून १९ जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यात छोटू भिका भोई, चेतन छोटू भोई, मंजाबाई अशोक भोई व विनायक मोतीराम भोई हे जखमी झालेले आहेत. अटकेतील संशयितांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नशिराबाद येथे काही दिवसापूर्वी जनावरांचे मांस पकडण्यात आले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयितांवर कारवाई झाली होती. त्याच कारणावरुन नशिराबादमध्ये गेल्या काही दिवसापासून धुसफूस सुरु होती. मांस पकडून दिल्याच्या कारणावरुन नशिराबादमध्ये शनिवारी रात्री एका गटाने दुसऱ्या गटावर लाकडी दांडके, लोखंडी सळईने हल्ला करुन दगडांचा मारा केला. यामुळे नशिराबादमध्ये वातावरण तापल्याने दोन गट समोरासमोर आले. या घटनेमुळे जळगावातून दंगा नियंत्रण पथक व राखीव दलाच्या तुकड्या मागविण्यात आल्या होत्या. चंद्रकांत गवळी यांनी रविवारी देखील दिवसभर नशिराबादमध्ये ठाण मांडले होते.

यांच्याविरुध्द दाखल झाला गुन्हा

मुस्ताक शेख मुसा कुरेशी, शेख अनिस शेख हसन, साजीदखान दाऊद खान, जुबेरखान सलीमखान, नूर मोहम्मद शेख मुस्ताक, मोहम्मद रईस शेख मेहबूब, अय्युबखान दाऊदखान, शोएब शेख गुलाब, असलम खान अय्याजखान, गफूरखान अहमदखान, बाली उर्फ अख्तरखान रज्जाकखान, रहीम हारुन मिस्तरी, अज्जु अल्ताफ खाटीक, शेख नासीर शेख सलीम बऱ्हाणपुरी, पीर मोहम्मद शेख मुस्ताक, बबलु रहिम (रिक्षावाला), हनिफ अफजोल्लीदीन बटाटेवाला, अजीज व बशीर यांच्यासह इतर ७ ते १० जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न करणे व नियोजनपूर्वक दंगल घडवून आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. छोटू भिका भोई यांनी फिर्याद दिली आहे. तपास भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार करीत आहेत.

कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

नशिराबाद येथील कत्तलखाना बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी वारंवार केली आहे, मात्र प्रशासनाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हा कत्तलखाना बंद झाला असता तर कदाचित ही घटना घडलीच नसती, असेही गावकरी सांगत आहेत.

कोट...

नशिराबाद हे गाव आधीच संवेदनशील आहे. याआधी येथे दंगली झालेल्या आहेत. प्रभारी अधिकारी रजेवर असल्याने गाव वाऱ्यावर आले आहे. घटना घडली तेव्हा एकही अधिकारी येथे हजर नव्हता. मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण राहीले असते.

-लालचंद पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

कोट..

गावात आता शांतता आहे. राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केलेल्या असून आपण स्वत: थांबून आहोत. पाच जणांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

Web Title: Riots arrested overnight in Nasirabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.