खाद्यतेलाच्या भाववाढीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:55+5:302021-01-09T04:12:55+5:30
जळगाव : गरीब व श्रीमंताच्या स्वयंपाकघरातील आवश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या भावात काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सध्या सोयाबीन तेल ...
जळगाव : गरीब व श्रीमंताच्या स्वयंपाकघरातील आवश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या भावात काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सध्या सोयाबीन तेल १३५ रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल ३० ते ३५ रुपयांची वाढ खाद्यतेलामध्ये नोंदविण्यात आली आहे.
पामतेलचे आयात शुल्कात वाढ
एरव्ही पामतेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणार्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे पामतेलाचे भाव वाढले. पामतेलाचे भाव सोयाबीन तेलाच्या भावापर्यंत पोहोचल्याने त्याचा परिणाम होऊन सोयाबीन तेलाचेही भाव कडाडले.
दीड महिन्यात किलो मागे ३० ते ३५ रुपयांची वाढ
गेल्या काही दिवसांपासून तेलाचे भाव सातत्याने वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात १०० रुपयांच्या आत आलेल्या सोयाबीन तेलाचे भाव दिवाळीच्या काळात ११० ते ११६ रुपये प्रति किलो वर पोहोचले होते. त्यानंतर सोयाबीन तेलाच्या भावात सातत्याने वाढच होतच आहे. सध्या हे भाव १३३ ते १३५ रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचले आहेत.
शेंगदाणा तेलाची पावणेदोनशे रुपयांकडे वाटचाल
शेंगदाण्याची निर्यात सुरू झाल्याने शेंगदाण्याचे भाव वाढले व त्याचा परिणाम तेलावर होऊन शेंगदाणा तेलही १५० ते १५५ रुपयांवर पोहोचले होते. मात्र आता शेगदाणा तेलदेखील १७० ते १७२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहे.
पाॅईन्टर
१) ब्राझिलमध्ये सुरू असलेल्या स्ट्राइकचा परिणाम.
२) मागणीपेक्षा पुरवठ्यात असलेली मोठी तूट.
३) आयात शुल्कामध्ये झालेली मोठी वाढ.
४) अवकाळी पावसामुळे सोयाबीनसह तेलबियाच्या हंगामात झालेली घट.
५) कच्च्या मालाचा होणारा कमी प्रमाणातील पुरवठा.
कोट
अवकाळी पावसामुळे या वर्षी सोयाबीनसह तेलबियांचा हंगाम कमी प्रमाणात आला. त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये सुरू असलेला स्ट्राइक व वाढलेले आयात शुल्क यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. ब्राझीलमधील स्ट्राइक संपला असून, आता काही प्रमाणात भाव कमी होण्याची शक्यता आहे.
मनीष भिकमचंद देवपुरा,
सध्या खाद्यतेलाचे किलोचे भाव
सोयाबीन तेल : १३२ ते १३५
शेंगदाणा तेल : १७० ते १७२
सूर्यफूल तेल : १४३ ते १४४
पामतेल : १२२ ते १२३
सरकी तेल : १२५ ते १२७