वाढत्या कोरोनासोबत भाजीपाल्यांचे दरही वाढू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:16+5:302021-04-12T04:14:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारात दोन आठवड्यांपासून वधारलेले तेलाचे भाव अजूनही वाढलेलेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारात दोन आठवड्यांपासून वधारलेले तेलाचे भाव अजूनही वाढलेलेच आहेत. इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर असून वाढत्या उन्हासोबत मात्र भाजीपाल्याचे दरही वाढू लागले आहेत. यात ब्रेक द चेन मुळे परिणाम होऊन मागणी वाढल्यानेदेखील भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात दोन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४५ ते १४७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते पुन्हा १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १६० ते १६५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भाव अजूनही कायम आहेत. शेंगदाण्याचे भाव १२५ ते १३० रुपये प्रतिकिलो, साबुदाणा ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे.
पालेभाज्यांचे भाव वाढू लागले
सध्या उन्हाळा सुरू झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहे. कोथिंबीर ७० रुपये किलो तर मेथीही ६० रुपये किलोवर आहे.
कांदे-बटाटे वधारले
काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा २५ ते ३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. कांद्याचे भावदेखील २५ ते ३० रुपयांवर पोहोचले आहेत. टमाटे ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
लिंबूला वाढली मागणी
उन्हाळा लागल्यामुळे लिंबूला चांगलीच मागणी वाढली आहे. त्यात कोरोनामुळे लिंबू खरेदीला पसंती दिली जात आहे. त्यामुळे देखील लिंबूचे भाव वाढून ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
--_------_----------
खाद्यतेलाचे भाव वाढलेले असल्याने आर्थिक भार वाढतच आहे. कोथिंबीर, हिरव्या पालेभाज्यांचे भाव वाढल्याने चिंता वाढविली आहे.
- राजू चौधरी, ग्राहक
खाद्यतेलाच्या भावात वाढ कायम आहे. इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे भाव व मागणी कमी- जास्त होत आहे.
- महेश वाणी, व्यापारी
सध्या पालेभाज्यांचे भाव वाढत आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने व लॉकडाऊनच्या भीतीने मागणी वाढली आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे.
- गणेश पाटील, भाजीपाला विक्रेते