कमी वयाच्या गर्भवतींना कोरोनाचा धोका अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:00+5:302021-05-10T04:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कमी वयाच्या महिलांचे मृत्यू पहिल्या लाटेच्या तुलनेत वाढले असून यात २१ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कमी वयाच्या महिलांचे मृत्यू पहिल्या लाटेच्या तुलनेत वाढले असून यात २१ वर्षांखालील गर्भवती महिलांना अधिक धोका असल्याचे डॉक्टर सांगतात. २० वर्षांच्या बाधित दोन महिलांचे मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात ५० वर्षांखालील १६ महिलांचा मृत्यू झाला आहे.
पहिल्या लाटेत महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. मात्र, हेच प्रमाण दुसऱ्या लाटेत मात्र समान राहिले आहे. दुसऱ्या लाटेत महिलांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली आहे. त्यातच कमी वयाच्या महिलांचे मृत्यू अधिक प्रमाणात होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सिझरियन झालेल्या एका वीस वर्षीय मातेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारीही खेडी येथील २० वर्षीय विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. शाहू महाराज रुग्णालयात २० एप्रिल रोजी मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी या विवाहितेला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर जीएमसीत दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले. मात्र, तिचा शनिवारी मृत्यू झाला.
डॉक्टर काय सांगतात
२१ वर्षांखालील विशेषत: १७, १८, १९ वर्षांत होणाऱ्या प्रसूती या वैद्यकीय क्षेत्रात रिस्की मानल्या जातात. या वयोगटात महिलांची प्रतिकारक्षमता अत्यंत कमी असते. शिवाय १८ वर्षांनंतर दोन मुलांमध्ये कमी अंतर असल्यास अशा महिलांना धोका अधिक असतो, बऱ्याच वेळा महिलेचे मूळ वय कमी असते. मात्र, नोंदविले अधिक जाते, त्यामुळे दोन बाळांमध्ये किमान तीन वर्षांचे अंतर हवे, असे स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
आठवडाभरातील ५० वर्षाँखालील मृत्यू
२ मे
जळगाव शहर ४८ वर्षीय महिला
एरंडोल तालुका ४८ वर्षीय महिला
चाळीसगाव तालुका ४५ वर्षीय महिला
३मे
भडगाव तालुका ४७ वर्षीय महिला
चोपडा तालुका ३५ वर्षीय महिला
४ मे
जळगाव तालुका ४८ वर्षीय महिला
पाचोरा तालुका ४३ वर्षीय महिला
५ मे
पाचोरा तालुका ३८ वर्षीय महिला
अमळनेर तालुका ४५ वर्षीय महिला
६ मे
भडगाव तालुका ४८ वर्षीय महिला
भुसावळ तालुका ४९ वर्षीय महिला
७ मे
पाचोरा तालुका ३० वर्षीय महिला
यावल तालुका ४८ वर्षीय महिला
८ मे
जळगाव शहर ४० वर्षीय महिला
रावेर तालुका ४२ वर्षीय महिला
भडगाव तालुका ४६ वर्षीय महिला
वयोगटानुसार महिलांचे मृत्यू (दोन्ही लाटेतील आकडेवारी )
० ते १० : २
११ ते २० : २
२१ ते ३० : १२
३१ ते ४० : ३५
४१ ते ५० : ११३
५१ ते ६० : १९८
६१ ते ७० : २४८