म्यूकरमायकोसिसचा ३० ते ६० वयोगटासाठी धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:54+5:302021-05-15T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११ रुग्णांना म्यूकरमायकोसिसचे निदान झाल्यानंतर यांच्या निरीक्षणात हा आजार कोणत्याही वयोगटातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११ रुग्णांना म्यूकरमायकोसिसचे निदान झाल्यानंतर यांच्या निरीक्षणात हा आजार कोणत्याही वयोगटातील रुग्णांना होऊ शकतो. या ११ रुग्णांमध्ये ३० ते ६० वयोगटाचे रुग्ण असल्याचे निरीक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदविले आहे. दरम्यान, स्वच्छतेचा अभाव हा एक मुद्दा महत्त्वाचा असल्याने अतिदक्षता विभागातील सर्व साधनांची नियमीत स्वच्छता व्हावी, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यासह राज्यभरात म्यूकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जळगाव जिल्ह्यातही याचे रुग्ण अगदी झपाट्याने वाढत आहेत. त्यातच खासगी यंत्रणेत या आजाराचे उपचार हे महागडे असल्याने याचे उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या आजाराचा आढावा घेऊन स्वच्छतेबाबत सूचना दिल्या आहेत.
असे आहे निरीक्षण
ज्यांना म्युकरमायकोसिस झाला, त्यातील ८ रुग्णांना मधुमेह आहे. यात ७ पुरूष व ६ महिलांचा समावेश आहे. ३० ते ६० वयोगटातील हे रुग्ण आहे. जीएमसीत ३ मृत्यू, मात्र, ते कोविडमुळेच झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे
अशी असेल कार्यपद्धती
टास्कफोर्समधील औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉक्टर हे रुग्ण संशयित असल्याची घोषणा करतील, त्यानंतर त्याच्या लक्षणानुसार नेत्ररोगतज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ हे संबधित रुग्णांची तपासणी करतील. त्यानंतर सुक्ष्मजीव शास्त्र विभागाद्वारे तपासण्या केल्या जातील, यात बुरशीची वाढ किती याची एक तपासणी होईल. त्यानंतर औषधोपचार सुरू करण्यात येतील, रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज पडल्यास ती जीएमसीतच होईल, दरम्यान, हे उपचार जनआरोग्य योजनेतून होणार आहेत.
तज्ज्ञ काय सांगतात
औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.भाऊराव नाखले यांनी सांगितले की, ही बुरशी जमिनीवर व दमट वातावरणात वाढते, हवेतून ती विविध वस्तूंवर बसते, कोविडमध्ये रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते, त्यातच मधुमेह, विविध प्रकारच्या औषधी प्रतिकारक्षमता अधिक प्रभावीत करीत असतात, अशा वेळी या बुरशीशी संपर्क आल्यास हा आजार बळावण्याचा धोका असतो. यात लवकर निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. यात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत मृत्यूदर आहे.