इच्छाशक्तीच्या जोरावर धावलो खडतर शर्यत - नीलेश भांडारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:53 PM2019-06-22T12:53:42+5:302019-06-22T12:53:51+5:30
८७ किमीची डर्बन कॉम्रेड्स मॅरेथॉन केली पूर्ण
जळगाव : इच्छाशक्तीच्या जोरावर डर्बन येथे आयोजित केली जाणारी ८७ किमीची कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली. जर प्रत्येकाने ठरवले तर अशक्य काहीच नाही, हे प्रत्येकाला शक्य आहे, असे प्रतिपादन जळगावचे धावपटू आणि नुकतीच डर्बन येथील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणारे नीलेश भांडारकर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील लोकमत शहर कार्यालयाला नीलेश भांडारकर यांनी आज भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, जळगाव रनर्सचे डॉ. रवी हिरानी, विक्रांत सराफ उपस्थित होते.
भांडारकर यांनी आपला सराव आणि डाएट याबाबत माहिती देतांना सांगितले की, पुण्याचे गिर्यारोहक किशोर धनकुडे यांच्यामुळे डर्बनची ही जुनी आणि सर्वात कठीण मॅरेथॉन पूर्ण करण्याची कल्पना मनात आली. त्यानंतर यासाठी प्रयत्न सुरू झाले. टेकड्यांच्या रांगांमधून होणाऱ्या या शर्यतीचा सराव जळगावमध्ये होणे शक्य नव्हते.
मात्र तरीही सकाळी पाच ते आठ यावेळेत मोहाडी रोड, विद्यापीठ परिसर, कोल्हे हिल्स या भागात सराव केला. अधिक सरावासाठी पुणे ते लवासा, लोणावळा ते अॅम्बी व्हॅली या डोंगरी भागात पुण्यातील मित्रांसह गेलो. तसेच कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे देशभरातील धावपटू हे याच भागात सराव करतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला.
या प्रवासाची सुरुवात कशी झाली. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझे वजन १३६ किलो होते. त्यामुळे शारीरिक समस्या उद्भवत होत्या.
मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि जळगाव रनर्स ग्रुपची साथ मिळाली. हळूहळू दहा किलोमीटर धावायला लागलो. नंतर ४२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण धावलो. त्यानंतर अल्ट्रा रनसाठी प्रयत्न केले. त्यातील एक मोठी शर्यत कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली, असे त्यांनी सांगितले.
ही शर्यत पूर्ण करताना कुटुंबावर आणि व्यवसायावर त्याचा कसा परिणाम होतो, यावर बोलताना भांडारकर यांनी सांगितले की, याचे सकारात्मक परिणाम जास्त दिसून आले.
आता माझे पूर्ण कुटुंबच वेगवेगळ्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी होते. तसेच दिवसभर काम करताना उत्साहदेखील जाणवतो. कुटुंबाने याबाबतीत सहकार्य केले. त्यांच्याशिवाय हा मोठा पल्ला गाठता आलाच नसता’, असेही ते भांडारकर म्हणाले.