Maharashtra Rain: चाळीसगाव परिसरात नदी, नाल्यांना पूर; बाजारपेठेतही शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:33 AM2021-08-31T09:33:48+5:302021-08-31T09:34:09+5:30
Rain in Jalgaon: तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला आहे.
चाळीसगाव जि.जळगाव : शहर व ग्रामीण भागात मंगळवारपासून सुरु झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या दक्षिणेला असणा-या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. (flood Water logged in Chlisgaon area. )
तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला आहे.
शिवाजी घाट परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तितूर नदीलाही पूर आल्याने घाट रोडवरील जुन्या पुलावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गत २४ तासात ५४६ मिमी पाऊस झाला आहे.
मन्याड धरणातूनही पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी - नाले दूथडी भरुन वाहू लागल्याने गिरणा नदीही वाहू लागली आहे. सकाळपासून जामदा बंधा-यावरुन १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारनंतर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठालगतच्या रहिवाश्यांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, या पावसामुळे पीकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.