रस्ते अपघातात वर्षभरात १२,५६५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:42 AM2020-02-03T03:42:20+5:302020-02-03T03:42:27+5:30
राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत ३२ हजार ८७६ रस्ते अपघात झाले.
- सुनील पाटील
जळगाव : राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत ३२ हजार ८७६ रस्ते अपघात झाले. त्यात १२ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी अपघातात १० टक्के घट होणे अपेक्षित आहे, राज्यात अपघातात ८ तर जिल्ह्यात ९ टक्के घट झाली आहे.
२०१९ मध्ये सर्वाधिक २ हजार ८५६ अपघात मुंबईत झाले. त्यात ४०५ जण ठार झाले. सर्वात जास्त ८७३ जण औरंगाबाद जिल्ह्यात तर त्याखालोखाल ८५५ जण पुणे जिल्ह्यात ठार झाले आहेत. नाशिक जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे ७८३ जणांचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यात १ हजार ६५ अपघातात ५३१ जण ठार झाले आहेत. जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ८३५ अपघातात ४५४ जण ठार झाले. २०१८ मध्ये राज्यात ३५ हजार ७१७ अपघात झाले होते, त्यात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू तर ३१ हजार २६५ जण जखमी झाले होते.
तरुणांचीच सर्वाधिक संख्या
अपघातात ४० वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत.
अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वेळोवेळी महामार्गावर नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम राबविण्यात येते.
आता हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. खड्डे व खराब रस्त्यामुळेच सर्वाधिक अपघात झालेले आहेत. त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक