जळगावात बाजारपेठ बंद करून दोन ठिकाणी रोखला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 06:43 PM2018-08-09T18:43:39+5:302018-08-09T18:50:36+5:30
महाराष्ट्र बंद दरम्यान जळगावात मराठा समाजाच्या तरुणांच्यावतीने जळगावातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याच आवाहन करण्यात येऊन चित्रा चौक तसेच आकाशवाणी चौकात ठिय्या देऊन मार्ग रोखण्यात आला.
जळगाव : महाराष्ट्र बंद दरम्यान जळगावात मराठा समाजाच्या तरुणांच्यावतीने जळगावातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याच आवाहन करण्यात येऊन चित्रा चौक तसेच आकाशवाणी चौकात ठिय्या देऊन मार्ग रोखण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी सकाळी शहरातील बाजारपेठेतील दुकाने सुरू करायचे की नाही या विचारात व्यावसायिक होते. त्यामुळे काही जणांनी सकाळी दुकाने उघडली तर बहुतांश दुकाने बंद होती.
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मराठा समाजाच्या १०० ते १५० जणांचा तरुणांचा एक गट जोरदार घोषणाबाजी करीत शिवतीर्थ मैदानाजवळ पोहचला. या ठिकाणी दुचाकी लावून हे तरुण गोलाणी मार्केटमध्ये गेले. तेथे जे काही दुकाने सुरू होती. त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार काही वेळातच गोलाणी मार्केट पूर्णपणे बंद झाले.
तेथून पुढे हा गट महात्मा फुले मार्केटकडे रवाना झाला. तेथेदेखील जी दुकाने सुरू होती त्यांना बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमध्येही शुकशुकाट पसरला. अशाच प्रकारे पुढे बी.जे. मार्केटदेखील बंद करण्यात आले.
चित्रा चौकात आल्यानंतर तेथे भर चौकात या तरुणांनी ठिय्या दिला. काही तरुणांनी उभे राहून आपल्याला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे असून कोणीही हिंसा व नुकसान न करण्याचे आवाहन केले.