खड्डेमुक्त रस्ते मोहिमेसाठी गतीने कामे पूर्ण करावीत - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 01:43 PM2017-12-04T13:43:46+5:302017-12-04T16:44:26+5:30
खड्डेमुक्त रस्ते मोहीम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत. जे अधिकारी आपल्या कामात कसूर करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
जळगाव - खड्डेमुक्त रस्ते मोहीम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत. जे अधिकारी आपल्या कामात कसूर करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून जे अधिकारी वेळेत काम पूर्ण करतील, त्यांचा विभागाच्यावतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात.
खड्डेमुक्त रस्ते मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हयातील रस्त्यांचा आढावा घेण्यासाठी पाटील यांनी सोमवारी येथील अजिंठा विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता गायकवाड, मोराणकर यांचेसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयमार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांची परिस्थिती, त्यावरील खड्डयांची परिस्थिती, किती किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले, किती कामे अपूर्ण आहे याचा उपविभागनिहाय आढावा घेऊन अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ज्या अधिकाऱ्याच्या उपविभागातील कामे अपूर्ण आढळून येतील, त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल.
त्याचबरोबर जे अधिकारी वेळेत कामे पूर्ण करतील. त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. आपल्या विभागातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने कामे करावीत. प्रसंगी आपली कार्यक्षमता वाढविण्याचाही सल्ला दिला.
सन्मानासाठी द्यावे लागणार पाच व्यक्तींचे प्रमाणपत्र
15 डिसेंबरपूर्वी प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांचा विभागातर्फे सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्याकरीता या अधिकाऱ्यांना ज्या भागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले आहे त्या भागातील पाच व्यक्तींचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. यामध्ये गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, संबंधित गावाचा सरपंच आणि एका सामाजिक संस्थेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. एका जिल्ह्यातील 50 अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून अधिकाऱ्यांची निवड करण्याचे अधिकार मुख्य अभियंता यांना देण्यात आल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांची प्रलंबित बीले येत्या जानेवारी अखेर देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळण्यासाठी मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन काम सुरू करण्याचे आदेशही कंत्राटदारांना वेळेत दिले गेले पाहिजे. जेणेकरुन वेळेचा अपव्यय होणार नाही असेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.