शहरात होतोय रस्ते विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:46+5:302021-02-06T04:27:46+5:30
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. त्याचे काम हरयाणातील एका ठेकेदार संस्थेने घेतले ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. त्याचे काम हरयाणातील एका ठेकेदार संस्थेने घेतले आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत मार्चपर्यंतच असली तरी कोरोनामुळे काही काळ काम बंद होते. त्यामुळे आता पुन्हा या कामाला सहा महिने मुदतवाढ मिळू शकते. मात्र सद्य:स्थितीत या रस्त्याच्या कामाला चांगलाच वेग मिळाला आहे.
या कामासोबतच सध्या रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांकडून काही ठिकाणी दुरुस्ती सुचवली जात आहे. आयएमआर जवळ महामार्गावरून खाली उतरायला जागाच नाही. बहुतांश वाहनधारक उलट दिशेने जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
प्रभात चौक, गुजराल पेट्रोल पंपाच्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या रस्त्यावर प्रभात चौक, गुजराल पेट्रोल पंप, दादावाडी येथे भुयारी मार्ग होणार आहे. त्यासाठीच्या कामाला आता वेग आला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हे काम बंदच होते. नंतर परवानगी मिळाल्यापासून या रस्त्याचे चौपदरीकरण वेगात सुरू झाले आहे. यातील बहुतांश भागातील काम अखेरच्या टप्प्यात देखील आले आहे. त्यासोबतच नागरिकांची शिव कॉलनी, सालार नगर आणि खोटेनगर येथेदेखील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग करून मिळावे, ही आग्रही मागणी आहे. मात्र सद्या जी निविदा काढण्यात आली, त्यात याचा समावेश करण्यात आला नव्हता. नंतर चेंज ऑफ स्कोप अंतर्गत मिळणाऱ्या रकमेतून शिवकॉलनीचे काम करण्यात येणार आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.
शिव कॉलनी भुयारी मार्गाला मंजुरी कधी?
शिव कॉलनी चौक हा पोलीस प्रशासनाने अधिकृतरित्या ब्लॅक स्पॉट जाहीर केला आहे. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही शिव कॉलनीच्या भुयारी मार्गाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सालार नगरात काय होणार?
शहरातील सालार नगरात दोन्ही बाजुंनी रस्ता ओलांडण्यात अडचणी येतात. शाळा आणि धार्मिक स्थळे असलेला हा परिसर आहे. त्यामुळे येथे रस्ता ओलांडण्यासाठी योग्य तो पर्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहे.
अग्रवाल चौकात देखील होणार भुयारी मार्ग
मू.जे. महाविद्यालयाजवळ असलेल्या या चौकात महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. त्यासाठी एक छोटा बोगदा काढला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त रक्कमदेखील मोजावी लागणार नाही.