इच्छादेवी ते अजिंठा चौफुला रस्ता ठरतोय नवा ॲक्सिडेंट स्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:41+5:302021-01-20T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण हे सध्या तरी जळगावकरांसाठी शाप ठरत आहे. महामार्गाच्या सुरू असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण हे सध्या तरी जळगावकरांसाठी शाप ठरत आहे. महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी किरकोळ अपघात होतच असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठे अपघात होत आहे.
या मार्गावर अहोरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यातच काम सुरू असल्याने रस्ता लहान झाला आहे. काही ठिकाणी दोन्ही बाजू खोल गेल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. तरीही त्याकडे ठेकेदार संस्थेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही दिवसातच दोन मोठे अपघात झाले आहेत.
अतिक्रमणाकडे कधी लक्ष देणार
महामार्ग प्राधिकरणाने शहरातील चौपदरीकरणाचे काम एका ठेकेदार संस्थेला दिले आहे. सालार नगर, मिल्लत नगर या भागात समांतर रस्ते करण्यास सुूरुवातदेखील करण्यात आली आहे. त्यासाठी या रस्त्यावर भराव टाकून ते सपाटीकरण करण्यात आले. या रस्त्यावर जुन्या चारचाकी विक्रेते, परिसरातील विविध दुकानदार यांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे अजूनही महामार्ग प्राधिकरणाने लक्ष दिलेले नाही. यामुळे या भागात अतिक्रमण हे वाहन चालवणाऱ्यांसाठी शाप बनले आहे.
अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करणार : सिन्हा
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण आम्ही लवकरच काढणार आहोत. त्यासाठी महापालिकेच्या मदतीने कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली.