रस्ता लांब-रुंद अन् रेल्वे बोगदा ठेंगणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:20+5:302021-06-09T04:20:20+5:30

चाळीसगाव : एरंडोल-नांदगाव हा जळगाव आणि नाशिकसह नगर जिल्ह्याला जोडणारा रस्ता चाळीसगाव, भडगाव तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या परिसरातील ...

The road is long and wide and the railway tunnel is blocked | रस्ता लांब-रुंद अन् रेल्वे बोगदा ठेंगणा

रस्ता लांब-रुंद अन् रेल्वे बोगदा ठेंगणा

Next

चाळीसगाव : एरंडोल-नांदगाव हा जळगाव आणि नाशिकसह नगर जिल्ह्याला जोडणारा रस्ता चाळीसगाव, भडगाव तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या परिसरातील बागायतीपट्ट्यांतून शेतमालाच्या होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी मात्र अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. जामदा गावाजवळील रेल्वे बोगद्याची उंची वाढवून रस्त्याचे काम केले जावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. रेल्वे बोगदा ठेंगणाच राहिल्यास ऊस, कपाशीने भरलेल्या गाड्यांसाठी हा बोगदा पुरेशा उंचीचा नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

एरंडोल ते येवला हा मार्ग चाळीसगावसह भडगाव तालुक्यातूनही पुढे जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात शेतमाल वाहून नेणाऱ्या वाहनांची वाहतूक होते. शेतमालासाठी नाशिक व धुळे येथील बाजारपेठ गाठणे या मार्गाने वाहनधारकांना सोयीचे होते. परिसरात ऊस व कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. पाच ते सात हजार असे या दोन्ही पिकांचे लागवडीचे क्षेत्र आहे. साहजिकच ऊस व कपाशीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. जामदा गावानजीक चाळीसगाव-धुळे रेल्वेमार्ग गेला आहे. एरंडोल-येवला मार्गावर याच रेल्वेचा बोगदा असून त्याची उंचीही रस्त्याचे काम सुरू असताना वाढविणे गरजेचे आहे, अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

तीन जिल्ह्यांसह तीर्थस्थळांना जोडणारा सेतू

एरंडोल-येवला राज्य महामार्ग हा नाशिकसह जळगाव जिल्ह्याला जोडणार सेतू ठरणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्हा व शिर्डीसारखे प्रसिद्ध तीर्थस्थळही जोडले जाणार आहे. या महामार्गातील बहुतांशी गैरसोयीचे अडथळे दूर केले असून यासाठी महायुती सरकारच्या सत्ताकाळात २७० कोटी रुपयांचा निधीही मिळवून घेतला.

जामदा रेल्वे बोगद्याबाबत लवकरच रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उंची वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

..........

चौकट

१११ किमीचा मार्ग

एरंडोल ते चाळीसगाव पर्यंतचा हा मार्ग १११ किमीचा आहे. पुढे तो नाशिक जिल्ह्यातील येवल्यापर्यंत जातो. २५० कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता चांगलाच लांब-रुंद असला तरी, रेल्वे बोगद्याची उंची ‘जैसे थे’ ठेवल्याने गैरसोयीचा ठरणार आहे. रस्त्याची रुंदी १० मीटर आहे. बोगद्याची उंची मात्र १२ ते १३ फूट उंच असल्याने ऊस व कपाशीची पूर्ण क्षमतेने भरलेली वाहने बोगद्यातून कशी जाणार? असा प्रश्न या परिसरातून उपस्थित होत आहे. म्हणूनच बोगद्याची उंची वाढवण्याची मागणी होत आहे.

.........

चौकट

अनेक गावांच्या वाहतुकीसाठीचा रस्ता

एरंडोल-येवला मार्गावरून चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील मेहुणबारे, जामदा, खेडगाव, बहाळ, पोहरे, टेकवाडे, वाडे, भऊर, आढळसे, गुढे आदि गावांमधून मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. गिरणाकाठ असल्याने भाजीपाल्याचीही वाहतूक केली जाते.

..........

इन्फो

परिसरातील शेतकऱ्यांची रेल्वे बोगद्याच्या उंचीबाबत असणारी मागणी रास्त आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या समस्येबाबत पत्र व्यवहार केला आहे. यानंतरही पाठपुरावा सुरूच ठेवला जाईल.

- मंगेश रमेश चव्हाण

आमदार, चाळीसगाव.

..........

इन्फो

रस्त्याचे काम होते आहे, हे स्वागतार्ह आहे. तथापि, रेल्वे बोगद्याची उंची वाढविणेही अत्यावश्यक आहे. बोगद्याची उंची वाढल्यास या परिसरातील शेतकरी व नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा होईल. सद्य:स्थितीत असणाऱ्या रेल्वे बोगद्यातून ऊस व कपाशीने भरलेली वाहने सुखरूप बाहेर निघणे अडचणीचे ठरणार आहे. बोगद्याची उंची वाढवावी, अशी आमची मागणी आहे.

- संजय रतनसिंग पाटील

जामदा, ता. चाळीसगाव

===Photopath===

070621\07jal_8_07062021_12.jpg

===Caption===

एरंडोल - येवला राज्य महामार्गावर जामदा रेल्वे बोगद्यासाठी सुरु असलेले काम

Web Title: The road is long and wide and the railway tunnel is blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.