रस्त्याची पुन्हा दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:49+5:302021-02-23T04:23:49+5:30
गर्दीवर नियंत्रणासाठी उपाय जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियमितच्या ओपीडीत गर्दी टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांची मदत घेऊन एका ...
गर्दीवर नियंत्रणासाठी उपाय
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियमितच्या ओपीडीत गर्दी टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांची मदत घेऊन एका वेळी रुग्णालयात पाच रुग्णांनाच पाठवावे, याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने गर्दी नियंत्रणासाठी उपाय करण्यात येत आहेत.
खड्ड्यामुळे अपघात
जळगाव : भजे गल्ली ते पांडे चौकापर्यंतच्या अंतर्गत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर एक दुचाकी घसरून एका महिलेला दुखापत झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. हा रस्तात अत्यंत ओबडधोबड झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आहाराबाबत सूचना
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारात सर्व बाबींचा समावेश आहे किंवा नाही, याबाबत आहारतज्ञांनी लक्ष द्यावे, अशा सूचना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या आहाराबाबत विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना आहेत.
जि.प.त दुर्लक्ष
जळगाव : कोरोना वाढत असताना जिल्हा परिषदेत मात्र, कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत विभाग सोडता अन्य कोणत्याच कार्यालयाच्या बाहेर सूचना लावण्यात आलेल्या नसून कोणत्याच विभागात बाहेरून आलेल्यांची तपासणी होत नसल्याचे गंभीर चित्र आहे. जि.प. यंत्रणेत या आधी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी बाधित झाले होते.
सभेकडे लक्ष
जळगाव : जिल्हा परिषदेची १७ रोजी आयोजित स्थायी समितीची बैठक तहकूब झाल्याने आता ही बैठक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निधीचे नियोजन, थांबवलेला निधी याबाबत या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिकारी मुंबईला गेल्याने ही सभा तहकूब करण्यात आली होती.
होम आयसोलेशनमधील रुग्ण वाढले
जळगाव : जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या जास्त आहे. साधारण साडेपाचशेच्या वर अधिक रुग्ण हे घरीच उपचार घेत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ८८९ झाली आहेत, यातील उर्वरित रुग्ण हे शासकीय व खासगी यंत्रणेत उपचार घेत आहेत. सौम्य लक्षणे, लक्षणे नसलेल्या रूग्णांना गृह अलगीकरणाची परवानगी दिली जाते.