चाळीसगावला रस्त्याची समस्या सुटली अवघ्या काही मिनिटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 02:27 PM2021-05-30T14:27:45+5:302021-05-30T14:28:17+5:30
अनेक वर्षापासूनची येथील जुना पाॕवर हाऊस परिससरातील प्रलंबित असलेली रस्त्याची समस्या अवघ्या काही मिनिटात सुटली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : सतत दुर्लक्ष झाल्याने समस्यादेखील सडतात, कुजतातही. पावसाळ्यात उगवून येणाऱ्याया छत्र्यांप्रमाणे पुन्हा डोकही वर काढतात. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या तडकाफडकी निर्णयामुळे याला फाटा मिळाला असून अनेक वर्षापासूनची येथील जुना पाॕवर हाऊस परिससरातील प्रलंबित असलेली रस्त्याची समस्या अवघ्या काही मिनिटात सुटली आहे. शनिवारी दुपारी निधीचे पत्र मिळाले आणि सायंकाळी भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाल्याचा अनुभव नागरिकांना मिळाला आहे.
शहरालगत पाॅवर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणाऱ्या चौधरी समाजाची आहे. या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा दगडमातीचा कच्चा असल्याने व त्यावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे असल्याने हा रस्ता दुरुस्तीची मागणी शेतकरी बांधव गेल्या ४० वर्षांपासून करत होते. त्यातच मागील २ दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे हातमजुरी करणाऱ्या मजुरांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने त्यावर पायी चालणेदेखील कठीण झाले होते. या समस्येमुळे मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल वेळेत बाजारात आणणे दुरापास्त होत होते. ही सर्व अडचण घेऊन या त्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारी आ. चव्हाण यांनी सकाळी भेट समस्या मांडली.
स्थानिक विकास निधीतून डोहर वाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करून देण्याची विनंती केली. यावेळी जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक अरुण अहिरे, सदानंद चौधरी, रोहन सूर्यवंशी, अनिल चौधरी, अमोल चौधरी, मयूर चौधरी यांच्यासह शेतकरी सचिन चौधरी, उमाकांत चौधरी, दत्तात्रय चौधरी, दिनकर चौधरी, गोपाल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रकांत चौधरी, पोपट चौधरी, मोहन चौधरी, भूषण चौधरी, चेतन चौधरी, रोहिदास चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, नामदेव चौधरी, सोनू चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी, जिभू चौधरी, धनंजय चौधरी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.
तात्काळ घेतला निर्णय
रस्त्याची जटील समस्या आणि शेतकऱ्यांची प्रामाणिक तळमळ पाहून आमदार चव्हाण यांनी निधी देण्याचा तात्काळ निर्णय घेतला. पावसाळा तोंडावर आला असल्याने ठेकेदाराला पाच लाख रुपये निधीचे पत्र देऊन स्वतः पैशांची जबाबदारी स्विकारत कामाला सायंकाळीच सुरुवात करण्याची सुचना दिली. आमदारांच्या या निर्णयामुळे उपस्थित शेतकरी भारावले. त्यांनी समाधानही व्यक्त केले. सायंकाळी या रस्त्याचे भूमिपूजन झाले.