पहिल्याच पावसात रस्त्यांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:20 PM2019-06-25T12:20:31+5:302019-06-25T12:22:09+5:30

बजरंग पुलाजवळ साचले पाणी, रस्ते खोदल्याने सर्वत्र चिखलच चिखल

Road raging in the first rain | पहिल्याच पावसात रस्त्यांची दाणादाण

पहिल्याच पावसात रस्त्यांची दाणादाण

Next

जळगाव : मोठ्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरात पावसाचे आगमन झाले़ सकाळी झालेल्या पावसामुळे ठिक-ठिकाणी पाणी साचले होते तर कुठं डबकी तयार झाली होती़ त्यातच काव्यरत्नावली चौक परिसरात एका पाण्याच्या डबक्यात स्कूल बस अडकल्याचा प्रकारही सकाळी घडला़ दरम्यान, अमृतच्या कामानंतर अनेक भागात रस्त्यांची दुरूस्ती थातूर-मातूर पध्दतीने केल्यामुळे अनेक रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला होता. या रस्त्यांवरुन पायी चालणे देखील कठीण झाले होते.
शहरासह जिल्ह्यात यंदा भीषण पाणी टंचाईची समस्या नागरिकांना भेडसावली़ काही तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्यामुळे पाण्यासाठी पाच ते दहा किमी पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली होती़ दरम्यान, यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता़ त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या़
जुनच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पाऊस होईल, अशी आशा होती. मात्र, पहिला तर सोडाच दुसरा व तिसरा आठवडा पुर्ण होण्यावर असताना देखील पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंता पसरली होती़ अखेर अधून-मधून पावसाच्या हुलकावण्या दिल्यानंतर सोमवारी शहरासह अनेक भागांमध्ये पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावली़
बच्चे कंपनींनी घेतला भिजण्याचा आंनद
या पावसामुळे काही प्रमाणात का होईना मात्र शेतकरी बांधव सुखावले़ तोच शहरातील काही चिमुकल्यांनी शाळेला दांडी मारत रस्त्यांवर येऊन भिजण्याचा आनंद घेतला़ पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला असून दुपारी मात्र प्रचंड उका जाणवत होता़
अमृत योजनेच्या कामामुळे जागोजागी चिखलच चिखल...
काही महिन्यांपासून शहरात अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्यांचे कामे सुरू आहेत़ रस्त्यांच्याकडेला खड्डे करून जलवाहिन्या टाकल्या जात आहेत़ मात्र, जलवाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती केली गेली आहेत़ त्यामुळे सोमवारी सकाळीच झालेल्या पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर चिखल साचला. चिखल आणि पाणी साचल्यामुळे पायी चालणे सुध्दा कठीण झाले तर ठिकठिकाणी डबकी साचली गेली़ काव्यरत्नावली चौकात तर स्कूलबसच डबक्यामध्ये अडकल्याचा प्रकार घडला़ सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही़
शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले होते आणि चिखलही झाला होता. मध्यवती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातर पाणी साचल्याने जायला जागा नव्हती. शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर साचलेले पाणी निघाल्याने वाहतूक सुरळीत झाली. अमृत योजनेच्या कामामुळे प्रचंड चिखल झाला.
पुल, रस्त्यांवर साचले पाणी
पहाटेपासूनच पावसाचे आगमन झाल्यानंतर एक ते दोन तास रिमझीम पाऊस सुरू होता़ त्यामुळे शहरातील मुख्य चौकांसह सखल भागाच्या रस्त्यांवर तलावाचे स्वरूप आलेले होते़ पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग पुल, त्यानंतर दाणाबाजार परिसर, जुने बी़मार्केट परिसरात रस्त्यांवर पाणी साचले होते़ त्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत होती. बजरंग पुलात देखील पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली़

Web Title: Road raging in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव