रस्त्याची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:58+5:302021-06-11T04:11:58+5:30
अंतर्गत रस्त्यांची चाळण जळगाव : मलनिस्सारण योजनेच्या कामानंतर खराब झालेल्या रस्त्यांची स्थिती अद्याप तशीच असून, जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूने ...
अंतर्गत रस्त्यांची चाळण
जळगाव : मलनिस्सारण योजनेच्या कामानंतर खराब झालेल्या रस्त्यांची स्थिती अद्याप तशीच असून, जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूने जाणाऱ्या रस्त्याची याच कामामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता मोठा वर्दळीचा असून, या ठिकाणी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सीसीसीत ८३ रुग्ण
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण कमी झाले असून, कोविड केअर सेंटरमध्ये आता केवळ ८३ रुग्ण दाखल आहेत. मध्यंतरी ही संख्या दोन हजारांवर गेली होती. यात जळगावात महापालिकेचे मोठे कोविड केअर सेंटर असून, या ठिकाणी १,६०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तीही यंदा फूल झाली होती.
वाहनांची प्रचंड गर्दी
जळगाव : जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी होत असून, काही वाहने तर थेट प्रवेशद्वारात लागत असल्याने या ठिकाणाहून ये - जा करणेही मुश्कील होत आहे. पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. वाहनांना वळून यावे लागत असून, सर्व वाहने ही रस्त्यावर जिल्हा परिषदेसमोर लागत आहेत.
मृत्यू थांबले
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी एकही मृत्यू झालेला नव्हता. गेल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात असे प्रथमच झाले आहे. मध्यंतरी या ठिकाणी दहापेक्षा अधिक मृत्यूची नोंद केली जात होती. आताही या ठिकाणचे मृत्यू वाढले होते. मात्र, त्यांची संख्या आता घटली असून, हे मृत्यू अगदी एक किंवा दोनवर आले आहेत.