भुसावळात रस्ते यापुढे मोकळा श्वास घेतील- मुख्याधिकारी चिद्रवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:59 PM2020-12-10T23:59:53+5:302020-12-11T00:02:57+5:30
भुसावळात गुरुवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली.
भुसावळ : शहरात गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून सुरू झालेली अतिक्रमण काढण्याची कारवाई सायंकाळी चार-साडेचार वाजेपर्यंत सुरू होती. ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले त्याच जागेवर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यापुढे शहरातील सर्व रस्ते मोकळा श्वास घेतील. सत्तेचा दुरुपयोग करून कोणीही बेकायदेशीर अतिक्रमणाचे कार्य करत असल्यास ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला.
याशिवाय नागरिकाच्या समस्या, तक्रारी असतील त्यांनी निसंकोच कळवाव्यात. त्याची नक्कीच त्याची दखल घेतली जाईल. ही सुरुवात असून शहरातील सर्व ठिकाणी अशाच पद्धतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. जणू त्यांनी या कारवाईतून हा इशारा दिला आहे.
बंदोबस्त
कारवईप्रसंगी उपमुख्यधिकारी महेंद्र कातोरे, शुभम अडकर, भटू पवार, प्रदीप पवार, वसंत राठोड, महेश चौधरी, विजय तोषनीवाल, राजू नाटकर यांच्यासह पालिका कर्मचारी पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत बंदोबस्त लावण्यात आला होता.
पाच पथके
अत्यंत गजबजलेल्या बाजारपेठ परिसरामध्ये झालेल्या कारवाईसाठी नगर रचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर विभाग, स्वच्छता विभाग तसेच इलेक्ट्रिक विभाग असे पाच पथक नियुक्त करण्यात आले होते.