शहरातील ते २० किमीचे रस्ते महापालिकेकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:02+5:302021-08-25T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून मनपा हद्दीतून गेलेल्या २० किमीच्या रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत. या विषयावरून मनपा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून मनपा हद्दीतून गेलेल्या २० किमीच्या रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत. या विषयावरून मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेला पोरखेळवर अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचा अंदाज समितीने घेतलेल्या आढावा बैठकीत बांधकाम विभागाने हे रस्ते मनपाकडेच असल्याचे स्पष्ट केले आहे, तसेच यावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना अंदाज समितीच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मनपा आयुक्त अनुत्तरित राहिल्याने, हे रस्ते मनपाकडेच असल्याने रस्त्यांवरून अतिक्रमण काढल्यानंतरच हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा सूचना अंदाज समितीने मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.
‘लोकमत’ ने गेल्या तीन दिवसांपासून शहरातून गेलेल्या २० किमीचे रस्ते नेमके मनपा की बांधकाम विभागाच्या हद्दीत आहेत. याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, तसेच बांधकाम विभाग व मनपाकडूनही याबाबत टोलवा-टोलवी करण्यात येत होती. दोन्ही ही विभाग एकमेकांकडे जबाबदारी झटकत या प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी विधिमंडळाच्या तीस आमदारांच्या अंदाज समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबत हे रस्ते मनपाकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही विभागांनी या रस्त्यांचा तमाशा केला
अंदाज समितीच्या सदस्यांनी शहरातून गेलेल्या सहा रस्त्यांचा सुरू असलेल्या पोरखेळाबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धरले. या रस्त्यांचा केवळ तमाशा दोन्हीही विभागांकडून सुरू असल्याचे सांगितले. हे रस्ते कोणाकडे याबाबत मनपा आयुक्तांना विचारण्यात आल्यावर त्यांनी याबाबत तपासणी करून, माहिती देण्याचे सांगितले, तर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी थेट हे रस्ते मनपाकडेच असल्याचे सांगितले. त्यावर अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे यांनी मनपाने केवळ ठराव केला होता. त्यामुळे त्या ठरावानंतर हे रस्ते थेट बांधकाम विभागाकडे जातील, असे होत नसल्याचे स्पष्ट केले.
अतिक्रमण काढा व बांधकाम विभागाकडे रस्ते द्या
महापालिकेकडे सद्यस्थितीत असलेले रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याआधी त्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी मनपाचीच असून, लवकरात लवकर ते अतिक्रमण काढून हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा सूचना अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे यांनी दिल्या. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्नावर सुरू असलेला पोरखेळही थांबविण्याचा सूचना समिती अध्यक्षांनी दिल्या आहेत.