रस्त्यांचे ग्रहण सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:52 PM2019-05-09T23:52:36+5:302019-05-09T23:52:59+5:30
विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगावकडून चारही बाजूला कोठेही जायचे झाल्यास सध्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहेत. ...
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जळगावकडून चारही बाजूला कोठेही जायचे झाल्यास सध्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तरसोद गणपती मंदिराचाही मार्ग सुटलेला नाही. त्यामुळे रस्त्यांचे हे ग्रहण लवकरात लवकर सुटावे, अशी मागणी केली जात आहे.
जळगाव -धुळे, जळगाव औरंगाबाद, जळगाव चांदवड, जळगाव-भुसावळ या चारही बाजूच्या रस्त्यांचे कामे सुरू करण्यात आले. त्यात औरंगाबाद रस्त्याचे काम रखडले असून इतर रस्त्यांचे कामे धिम्या गतीने सुरू आहे. याचा त्रास वाहनधारकांना दररोज सहन करावा लागत आहे.
यात तरसोद रस्त्याचेही काम रखडल्याने बाप्पाच्या भक्तांचा प्रवास खडतर असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. डांबराअभावी रखडलेले हे काम तत्काळ मार्गी लावून भाविकांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी संस्थानसह गणेशभक्तांच्यावतीने करण्यात येत आहे. तरसोद गणपती मंदिर येथे दर महिन्याची चतुर्थी, अंगारकी चतुर्थीसह नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रिघ असते. भाविकांचा ओघ पाहता येथे रस्ता चांगला असावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास भाविकांसह तरसोद ग्रामस्थांनाही सहन करावा लागत आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजमेंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्यानुसार आॅक्टोबर २०१८मध्ये या कामाला सुरुवात झाली. रस्ता मंजुरीनंंतर कामाला गती आली व मार्च महिन्यापर्यंत मुरुम टाकणे, खडीकरण, दबाई असे साधारण ८० टक्के काम झाले. मात्र १५ मार्चपासून हे काम बंद पडले आहे. त्यामुळे अपूर्ण रस्त्यामुळे गणेशभक्तांना अजूनही खडतर प्रवास करावा लागत आहे. तरसोद फाट्यापासून ते मंदिरापर्यंत ३.४२ कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर कोठे खडी पडलेली आहे तर कोठे खड्डे पडलेले आहे. डांबराअभावी हे काम रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी डांबराची समस्या निर्माण झाल्याने त्याचा फटका या रस्त्यालाही बसत असल्याची माहिती मिळाली. जवळपास अर्धा मे महिना उलटला तरी हे काम सुरू होत नसल्याने जून महिन्यात पावसाळा सुरू झाला तर जे काम झाले आहे, त्यावरही ‘पाणी’ फिरले जाईल व पुढील चार महिने आणखी हे काम होऊ शकणार नाही. त्यामुळे गणेशभक्तांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागेल व भाविकांना मंदिरापर्यंत पोहचणे कठीण होईल. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी हे काम मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे.