जळगावात शस्त्राचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:58 PM2018-10-02T12:58:06+5:302018-10-02T12:58:28+5:30
मेहरुण तलाव परिसरातील घटना
जळगाव : मेहरुण तलावाकडे फिरायला आलेल्या शुभम शरद बाविस्कर (वय २०, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या विद्यार्थ्याला चौघांनी मारहाण करुन शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या जवळील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल व एक हजार २०० रुपये रोख लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता मेहरुण तलाव परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शुभम बाविस्कर हा नूतन मराठा महाविद्यालयात बीएस.सीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. रविवारी मित्र योगेश गोरख पाटील (रा.शिवाजी नगर, जळगाव) याला सोबत घेऊन दोन्ही जण दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.बी.४९२२) रविवारी सायंकाळी मेहरुण तलावाकडे फिरायला गेले. तेथून परत येत असताना आठ वाजता ग्रॅपीज हॉटेलसमोर योगेश यास शौच लागल्याने दोन्ही जण तेथे थांबले. तेथून शिरसोली रस्त्याकडे अंधारात शौचास बसला. त्यावेळी हिरव्या रंगाच्या दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ डी. सी.२३३२) तीन ते चार तरुण आले. त्यापैकी एकाच्या हातात धारदार शस्त्र होते.त्याने हे शस्त्र गळ्याला लावून दोघांनी मारहाण करायला सुरुवात केली.
खिशातील एक हजार २०० रुपये व मोबाईल काढून घेतला. दुसऱ्याने हे शस्त्र योगेशच्या पायाला टोचून पळ काढला.
पाठलाग करुन घेतला दुचाकीचा क्रमांक
खिशातील पैसे व मोबाईल घेऊन हे तरुण अंधारात पळून गेले. आरडाओरड केल्यानंतर काही लोक मदतीसाठी धावून आले, त्यांनी यातील दोघांना झोडपले, मात्र हे तरुण लोकांच्या तावडीतून निसटले. या तरुणांना त्यांचा दुचाकीने पाठलाग केला असता ते सापडले नाहीत, मात्र त्यांच्या दुचाकीचा क्रमांक (क्र. एम.एच.१९ डी.सी.२३३२) नोंद करता आला. या तरुणांनी हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून ठाणे अमलदार दिलीप पाटील यांच्याकडे हकीकत कथन केली.
शुभम याच्या फिर्यादीवरुन अज्ञात तरुणांविरुध्द जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत. दरम्यान, मेहरुण तलाव परिसरात मारहाण व लुटीच्या घटना वाढल्या आहेत. काही महिन्यापूर्वी पिस्तुलचा धाक दाखवून एका उद्योजकाची कार लांबविण्यात आली होती. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही.