चिमुकलीच्या धाडसाने दरोडेखोरांचा डाव फसला..!
By सागर दुबे | Published: March 30, 2023 03:43 PM2023-03-30T15:43:09+5:302023-03-30T15:44:02+5:30
मुक्ताईनगरातील प्रकार ; रात्री वकीलाने गाठले पोलिस ठाणे
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील मुक्ताईनगर नगरात मुलगी घरी एकटे असल्याची संधी साधून पिण्यासाठी पाणी मागत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र घरात 'त्या' दहा वर्षीय चिमुकलीने धाडस दाखविल्यामुळे हा दरोडेखोरांचा दरोड्यांचा प्रयत्न फसल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. पाणी पाज नाही तर दरवाजा तोडून आत येवू अशी धमकी दिली. पण, मुलीने अजिबात न घाबरता दरवाजा न उघडून हिंमत दाखविली आणि दरोडेखोरांना परतवून लावले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मुक्ताईनगरात एस.एम.आय.टी. महाविद्यालाजवळ ॲड. सचिन देविदास पाटील (४३) हे पत्नी विद्या पाटील व दहा वर्षीय मुलगी श्रृंगी यांच्यासह वास्तव्यास आहे. पाटील यांच्या पत्नी पत्नी शिक्षिका आहेत. बुधवारी पाटील दाम्पत्य कामावर निघून गेले होते. दुपारी श्रृंगी ही शाळेतून घरी परतली, ती घरी एकटीच होती. दुपारी २ वाजता काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरी आले. त्यातील एकाने दरवाजा ठोठावला. लोखंडी ग्रिलींगच्या दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते, आवाज ऐकून श्रृंगी हिने लाकडी दरवाजा उघडला. त्यातील एका दरोडखोराने पिण्यासाठी पाणी मागितले, अनोळखी वाटत असल्याने तिने पाणी देण्यास नकार देवून तुम्ही इथून जा असे सांगितले आणि दरवाजा बंद केला.
पण, त्या व्यक्तीने पाणी पाज नाहीतर दरवाजा तोडून आतमध्ये घूसेल असे मुलीला धमकाविले. मात्र, तिने हिंमत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही. तब्बल १५ मिनिट दरोडेखोर दरवाजाजवळ थांबून होता. पण, मुलीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तिने खिडकीतून बाहेर डोकवून पाहिल्यावर झाडाखाली एका रिक्षात आणखी चार ते पाच जण दिसले. त्यातील एक जण 'प्लॅन सक्सेस झालाय' असे बोलत असल्याचे तिने ऐकले. अखेरपर्यंत श्रृंगीने कुठलाही प्रतिसाद न देता दरवाजा उघडला नाही, त्यानंतर दरोडेखोर आल्या मार्गाने निघून गेले.
पालकांनी घराकडे घेतली धाव..
दरम्यान, खिडकीतून श्रृंगीने शेजारच्यांना आवाज दिला. शेजारीची महिला धावत श्रृंगी हिच्याकडे आली. मुलीने सर्व प्रकार महिलेला सांगितला. नंतर विद्या पाटील ह्या सुध्दा घरी आल्या व सायंकाळी ॲड. सचिन पाटील हे सुध्दा घरी परतले. श्रृंगी हिने तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत पालकांना सांगितली. सर्व ऐकून ॲड.पाटील हे सुध्दा अवाक झाले. रात्री रात्री दहा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. रात्री बारा वाजता पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकाराचा पोलिस तपास घेत असून दरोडखोर हे साध्या रिक्षातून नव्हे तर पिंक रिक्षातून आले असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"