जळगावात कारमधून चोरट्यांनी २ बॅगा लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 07:36 PM2018-07-20T19:36:36+5:302018-07-20T19:38:35+5:30
रस्त्यावर तुमचे पैसे पडले असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी कारमधील दोन बॅगा लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूलासमोर घडली.
जळगाव : रस्त्यावर तुमचे पैसे पडले असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी कारमधील दोन बॅगा लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूलासमोर घडली. या दोन्ही बॅगांमध्ये पैसे नव्हते, मात्र त्यात कंपनीचे महागडे दोन लॅपटॉप होते. पैसे पडल्याचे सांगून बॅग लांबविल्याची ही दोन महिन्यातील चौथी घटना आहे. चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभ ेकेले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अशोका बिल्डकॉम प्रा.लि.या कंपनीचे विभागीय व्यवस्थापक पी.बी.नलावडे (रा.पुणे), सुरक्षा अधिकारी धनंजय धोंडगे (रा.सटाणा, जि.नाशिक) व अभियंता विजय नंदनवार (रा.सटाणा,जि.नाशिक) हे नाशिक येथून कामासाठी गुरुवारी कारने (क्र.एम.एच.१५ बी.एक्स.७०९४) जळगावात आले होते. नलावडे व धोंडगे हे कामगार आयुक्त कार्यालयात थांबले होते तर नंदनवार व चालक सिध्दार्थ अभिमन्यू पांडे असे दोघं जण कार घेऊन जिल्हा क्रीडा संकुलातील एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात आले होते. नंदनवार हे कार्यालयात तर चालक सिध्दार्थ कारमध्येच होता. यावेळी एक जण तेथे आला. तुमचे पैसे खाली पडले असे चालकाला सांगत त्याने दोन बॅगा घेऊन पळ काढला.