जळगावात हेल्मेट घालून घुसले दरोडेखोर, कर्मचाऱ्यांना बंधक बनविले; बँकेतील पैसे, दागिने घेऊन पसार
By सागर दुबे | Published: June 1, 2023 04:33 PM2023-06-01T16:33:18+5:302023-06-01T16:36:37+5:30
कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.
जळगाव : शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातल्या स्टेट बँकेच्या शाखेमध्ये गुरूवारी दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला. काळे कपडे आणि हेल्मेट घालून आलेले दोन दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून बंधक बनविले. एवढेच नव्हे तर बँक व्यवस्थापकाच्या पायावर चाकू मारून जखमी केले. बँक कर्मचारी पुरते हादरून गेल्यानंतर त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेत दरोडेखोरांनी बँकेतील सुमारे १७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि लाखोंचे सोने घेऊन पसार झाले. ही संपूर्ण घटना सकाळी 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यानात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तर जखमी व्यवस्थापकावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरूवारी सकाळी बँक उघडून नियमितपणे कारभार सुरू झाले. सकाळची वेळ असल्यामुळे बँकेत मोजकेच कर्मचारी वगळता जास्त लोक नव्हते. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास काळे कपडे व हेल्मेट घातलेले दोन दरोडेखोरांनी मागच्या दरवाजातून बँकेमध्ये प्रवेश केला. सफाई कर्मचारी मनोज रमेश सूर्यवंशी व सुरक्षारक्षक संजय गोविंदा बोखारे यांच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारून मारहाण केली आणि वॉशरूमकडे तोंडाल चिकटपट्टया लावून बांधून ठेवले. तर कॅश इन्चार्ज देवेंद्र नाईक व क्रेडीट कार्ड कर्मचारी नयन गिते यांना सुध्दा त्यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत एका ठिकाणी बसवून ठेवले. दरम्यान, गिते हा खिश्यातून मोबाईल काढत असल्याचा संशय आल्यामुळे एका दरोडेखोराने त्याच्या दिशेने चाकू फिरकावला. त्यात गिते याच्या हाताच्या बोटाला दुखापत होवून रक्तस्त्राव झाला.
डोळ्यात मारला स्प्रे नंतर चावी,चावी करत केली मारहाण...
बॅंक व्यावस्थापक राहूल मधुकर महाजन (३७, रा.मू.जे.महाविद्यालयजवळ) हे सकाळी ९.४५ वाजला ड्युटीवर आले. बँकेचा दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी दरवाजा ठोठावला. दरोडेखोरांनी दरवाजा उघडताच त्यांनी महाजन यांना पकडून मारहाण करीत इतर कर्मचा-यांना ज्या ठिकाणी बंधक म्हणून ठेवले, त्याठिकाणी नेले. तिथे त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारून लॉकरची चावी..चावी...असे दरोडेखोर बालू लागले. महाजन यांनी घाबरून बँगेत चावी असल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी बँगेतून चावी काढून राहूल महाजन व मनोज सूर्यवंशी यांना कॅश रूमकडे नेले. नंतर चाकूचा धाक दाखवून तिजोरी उघडली.
झटापट झाली अन् व्यवस्थापकावर चाकूने वार
दरम्यान, पैसे ठेवलेली तिजोरी मनोज सूर्यवंशी याने उघडून दिली. तेव्हा व्यवस्थापक राहूल महाजन यांनी एका दरोडेखोराशी झटापट केली. मात्र, त्या दरोडेखोराने महाजन यांच्या पायावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दरोडेखोरांनी सुमारे १७ लाखाची रक्कम कॅश रूममधून काढून घेतली. नंतर सोने ठेवलेली तिजोरी उघडायला सांगून त्यातील संपूर्ण सोने बँगमध्ये भरले. नंतर पसार झाले.