ऐकावं ते नवलच! सरपंच होण्याचं स्वप्न, पठ्ठ्याने २० घरफोड्या करत पैसे कमावले अन् निवडणूक लढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 04:07 PM2023-11-22T16:07:28+5:302023-11-22T16:29:04+5:30
आरोपीने मागील दोन वर्षांत घरफोडीचा सपाटा लावला होता. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात त्याने तब्बल २० घरे फोडत चोरी केली होती.
जळगाव : चुकीच्या प्रवृत्तींचा राजकीय क्षेत्रात झालेल्या शिरकावाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. अशातच आता चक्क एका अट्टल घरफोड्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावातून ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवाराबद्दल ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रवीण सुभाष पाटील असं सदर आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाचोऱ्यात गेल्या काही दिवसांत अनेक घरफोड्या झाल्या होत्या. या गुन्ह्यांमध्ये बिलवडी येथून ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचा उमेदवार असलेला प्रवीण पाटील याचा सहभाग असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाटील यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने २० घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
घरफोड्यातून आलेले पैसे निवडणुकीत उधळले!
प्रवीण पाटील याने मागील दोन वर्षांत घरफोडीचा सपाटा लावला होता. पाचोरा तालुक्यात त्याने तब्बल २० घरे फोडत चोरी केली होती. या चोऱ्यांतून आलेला पैसा त्याने बिलवडी ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च केला. मात्र सरपंचपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या प्रवीण पाटीलला गावकऱ्यांनी नाकारत त्याचा पराभव केला.
दरम्यान, आरोपी प्रवीण पाटीलकडून पोलिसांनी १७३ ग्रॅम सोने, एक स्विफ्ट डिझायर कार आणि एक दुचाकी असा एकूण २० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.