शेतावर दरोडा, ६३ शेळ्या लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 03:11 PM2021-10-17T15:11:34+5:302021-10-17T15:12:08+5:30
जागल्या आणि त्याच्या कुटुंबीयांना ठेवले कोंडून
अमळनेर : शेतातील शेड वर आठ ते दहा पावऱ्यानी दरोडा टाकून सुमारे २ लाखाच्या ६३ बकऱ्या घेऊन जागल्या व त्याच्या कुटुंबियाना कोंडून ठेवल्याची घटना १७ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली.
जालंदरनाथ सुरेश चौधरी यांनी जळोद रस्त्यावर गांधली शिवारात गट नम्बर २०६ मध्ये बकऱ्या पालन केल्या आहेत. रखवाली साठी त्यांनी सोमा भास्कर मोरे याला जागल्या म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. १७ रोजी पहाटे दीड वाजता आठ ते दहा जण तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी सोमा मोरे आणि त्यांच्या पत्नीला पावरी भाषेत दमदाटी करून मोबाईल हिसकावून सिम कार्ड काढून घेतले. व तुम्ही खोलीतच थांबा आरडाओरडा केल्यास तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यांनतर त्यांनी बकऱ्यांच्या शेडचे गेट तोडून ६३ बकऱ्या चोरून नेल्या. सोमा मोरे यांनी दरवाजा वाकवून मुलाला बाहेर काढून दरवाजा उघडला व पहाटे पाच वाजेला दुसऱ्याच्या मोबाईल वरून मालकाला फोन केला. मालकाने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानन्तर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,पोलीस उपनिरीक्षक शत्रुघन पाटील , हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , अमोल पाटील ,पोलीस नाईक शरद पाटील यांनी भेट दिली. हे शेड मुख्य रस्त्यापासून एक किमी पूर्वेला मध्ये आहे तसेच तेथे गाडरस्ता असल्याने चारचाकी जाऊ शकत नाही. त्यामुळे चोरट्यानी बकऱ्या हातात नेऊन चारचाकी जळोद रस्त्यावर लावलेली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.