भोंगऱ्याला लागणाऱ्या पैशासाठी टाकला दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:50 PM2019-03-03T12:50:40+5:302019-03-03T12:51:43+5:30
भंगारवाल्याकडे गेले अन् जाळ्यात अडकले
जळगाव : भोंगºया सणाच्या जल्लोषासाठी पैशाची गरज भासल्यानेच पावरा समाजातील दरोडेखोरांनी जळगाव तालुका शिवारात दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मद्याच्या तर्रर नशेत असलेल्या सहा दरोडेखोरांनी सालदार दौलत एकनाथ काळे (७५, सरस्वती नगर, जळगाव) यांच्या डोक्यात खाटेचा माचा टाकून खून करुन विहिरीत फेकले व त्यानंतर याच विहिरीजवळ या दरोडेखोरांनी जेवणही केले.
ममुराबाद रस्त्यावरील जळगाव तालुका शिवारात सालदाराचा खून व दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यात विक्रम बाजीराव उर्फ बाजºया बारेला (रा. भाळाबर्डी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश), पप्पु बुधा बारेला (रा. गधडदेव बोराडी, ता. शिरपुर, जि. धुळे), कैलास लालसिंग बारेला (रा. पांढरी, अडावद ता.चोपडा), सागर नंदाराव पावरा (रा.नाली झोपाला, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) व अमरसिंग बिलरसिंग पावरा (रा. धीलकोट काबरी, जि. खरगोन, मध्यप्रदेश) व एक अल्पवयीन अशा सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासाच्या आत जेरबंद केले.
दरम्यान, यातील अल्पवयीन व पारोळा पोलिसांच्या ताब्यात दिलेला पप्पू वगळता चार जणांना तालुका पोलिसांनी न्या.खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड. सुप्रिया क्षीरसागर यांनी काम पाहिले. तपास निरीक्षक दिलीप भागवत करीत आहेत.
काय आहे भोंगºया सणाचे वैशिष्ट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावरा समाजातील लोक भोंगºया सण जल्लोषात साजरा करतात. या समाजातील प्रामाणिक लोक सणाला गालबोट न लावता जल्लोष करतात तर काही जण या दिवशी दारु, मटनावर ताव मारतात. हा जल्लोष असो कि लग्न यासाठी पैसा लागतो. या पैशासाठीच या सहा जणांनी दरोडा टाकल्याचे तपासात उघड झाले. सालदाराचा खून करण्याचा हेतू नव्हता, मात्र दारुच्या नशेत असल्याने हे कृत्य घडल्याची कबुलीही दरोडेखोरांनी दिली. एरव्ही रस्त्यात झाड आडवे लावून लूटमार करणे ही पावरा गँगंच्या गुन्ह्याची गुन्हेगारांची पध्दत आहे.
बरमोडा, लुंगी व बनियन परिधान करुन घेरले दरोडेखोरांना
हा गुन्हा घडल्यानंतर तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अशा दोन्ही यंत्रणा कामाला लागल्या होत्या. घटनास्थळावरुन मंदिरातील घंटा, कॉपर वायर व इतर भंगार वस्तू लांबविण्यात आल्या होत्या.तसेच दरोडेखोर बोली भाषेवरुन पावरा समाजाचे असल्याचे उघड झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे मिलिंद सोनवणे यांनी गेंदालाल मील भागातील भंगार खरेदी घेणाऱ्यांना गाठले तर संतोष मायकल, अनिल इंगळे व रमेश चौधरी हे घटनास्थळावरुन माहिती काढतानाच रेल्वे स्थानकावर धडकले.
गेंदालाल मीलमध्ये भंगार विक्रीसाठी काही पावरा समाजाचे लोक आल्याची माहिती मिलिंद सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आम्ही येईपर्यंत भंगार मोजमाप करा, पैसे देऊ नका असे विक्रेत्याला सांगितले तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना माहिती देऊन अतिरिक्त कुमक मागवून घेतली. साध्या गणवेशात दोन रिक्षातून पथक गेंदालाल मील भागात गेले तर सोनवणे, इंगळे, मायकल व चौधरी हे ओळखू नये म्हणून लुंगी, बरमुडा, बनियन परिधान करुन भंगार घेणाºयाजवळ पोहचले. इशाºयावरुन पथकाने या सहाही जणांना घेरले. निसटण्याच्या आतच त्यांच्या मुसक्या आवळल्या.