जळगावात लग्नाच्या वरातीवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:55 PM2018-12-19T16:55:35+5:302018-12-19T16:57:24+5:30
घरुन निघालेली वरात मंगल कार्यालयात जात असताना तांबापुरातील बिलाल चौकात या वरातीत प्रार्थनास्थळात थांबलेल्या काही तरुणांनी दगडफेक केल्याने पळापळ झाली.
जळगाव : घरुन निघालेली वरात मंगल कार्यालयात जात असताना तांबापुरातील बिलाल चौकात या वरातीत प्रार्थनास्थळात थांबलेल्या काही तरुणांनी दगडफेक केल्याने पळापळ झाली. घटनेनंतर प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी गंभीर घटना टळली. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांपैकी दोघांचे नाव निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी गैर्दी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेत दगडफेक करणारा इरफान खान रहिम खान (वय १९, रा.महादेव मंदिर, तांबापुरा, जळगाव), नदीम शहा शकूर शहा (वय २०, रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा, जळगाव) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. इरफान व नदीम याला अटक करण्यात आली.
मेहरुणमधील दत्त नगरातील रहिवाशी तथा मुंबई पोलीस दलात नोकरीला असलेल्या रोहित संजय गडकर या तरुणाचे मंगळवारी लग्न होते. दुपारी एक वाजता महादेव मंदिराजवळून वरात वाजत गाजत निघून महामार्गावरील लाडवंजारी मंगल कार्यालयात जात असताना ही वरात दीड वाजता बिलाल चौकातील प्रार्थना स्थळाजवळ आली. त्यावेळी काही तरुणांनी या वरातीत अचानक जोरदार दगड व विटांचा मारा सुरु केला, त्यामुळे सर्वत्र पळापळ होऊन गोंधळ उडाला. या दगडफेकीत एका बालकाला दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, जितेंद्र राजपूत, सचिन पाटील व अशोक सनगत यांनी दगडफेक करणाºया तिघांना ताब्यात घेतले.