म्यूकरमायकोसीसचा जीएमसी व उल्हास पाटील रुग्णालयात कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:13+5:302021-05-19T04:17:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी यावर नियंत्रण आणण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी यावर नियंत्रण आणण्यासाठी दंत,नाक,कान, घसा तज्ज्ञ यांची बैठक घेतली. त्यात म्यूकरमायकोसीसवर नियंत्रणासाठी चर्चा करण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यात जीएमसीत कोविड आणि म्यूकरमायकोसीसचा एकाच वेळी सामना करणाऱ्या रुग्णांसाठी तर पोस्ट कोविडमध्ये म्यूकरमायकोसीस झालेल्यांना डॉ उल्हास पाटील रुग्णालयात उपचार मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सी.जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याह काही डॉक्टर्स उपस्थित होते.
या बैठकीत म्यूकरमायकोसीस नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देतांना म्यूकरमायकोसीस पासून बचावासाठी काय करायचे, याच्या सुचना दिल्या जाव्यात. तसेच रुग्णांना म्यूकरमायकोसीसची लक्षणे दिल्यास किंवा निदान झाल्यावर काय करायचे. यावरही चर्चा करण्यात आली.
म्यूकरमायकोसीसचा इलाज आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देखील केला जाणार आहे. त्यासोबतच आता सर्वत्र म्यूकरमायकोसीसवर उपचारात वापरले जाणारे ॲम्फोटेरिसिम बी या इंजेक्शनचा तुटवडा असला तरी त्याला पर्याय असलेल्या औषधांचा वापर केला जावा, अशा सुचना देखील याबैठकीत देण्यात आल्या आहेत.
जीएमसी म्यूकरमायकोसीसचा आणखी एक रुग्ण दाखल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्यूकरमायकोसीससाठी सुरू करण्यात आलेल्या कक्षात आता आणखी एक नवा रुग्ण दाखल झाला आहे. सध्या जीएमसीतील या कक्षात एकुण ७ रुग्ण दाखल आहेत.