‘अंतर्नाद’तर्फे गणेशोत्सवांतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:09 PM2018-09-05T17:09:42+5:302018-09-05T17:10:09+5:30
उपेक्षित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गोळा करून देणार
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवांतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. गरजू शाळा निवडून त्या ठिकाणी अध्ययन करणारे गोरगरीब विद्यार्थी हुंडकायचे. त्यांना पाटी, वह्या, दप्तरे, पेन, पेन्सील, कंपासपेटी, गणवेश अशा कोणत्या साहित्याची गरज आहे, त्याची नोंद करायची. दात्यांनी केलेल्या मदतीतून ते साहित्य पुरवायचे, असा हा उपक्रम आहे.
गणेशोत्सवाचे पावित्र्य राखून अनाठायी खर्च टाळून तो सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा, यासाठी अंतर्नादने गेल्या वर्षांपासून ‘समर्पण गणेशोत्सव’ उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. मूतीर्ची उंची वाढवण्याची स्पर्धा, डोळ्यांना त्रास होईल असा अनावश्यक रोषणाईचा झगमगाट, डीजेचा दणदणाट, कर्णकर्कश संगीत यांच्यावर जो अनावश्यक खर्च होतो त्यात बचत करून गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य भेट द्यावे, या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी ६ शाळांत उपक्रम
भुसावळ हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा निंभोरो बुद्रूक, भगिरथी प्राथमिक विद्यामंदिर भुुसावळ, जोगलखेडा, भानखेडा, कंडारी, श्री गाडगेबाबा हायस्कूल भुसावळ अशा सहा ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात ४५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून या वर्षी उपक्रमाला व्यापक स्वरुप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चोपडा, यावल, भुसावळ, धरणगाव अशा चार तालुक्यातील दात्यांचे सहकार्य लाभले होते.
मातीच्या मूर्र्तींसाठी प्रोत्साहन
पर्यावरण संवर्धनाचा विचार रूजण्यासाठी यंदा प्रतिष्ठानतर्फे शाडूमातीच्या गणेशमूर्ती स्थापनेला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यालाच ‘एक दुर्वा समर्पणाची’ या संकल्पनेची जोड देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला जो प्रतिसाद मिळाला त्यातून उत्साह वाढला. ‘लेक वाचवा’ अभियानाचे पुरस्कर्ते तथा धरणगाव महाविद्यालयाचे प्रा.वा.ना.आंधळे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली होती. यंदा व्यापक स्वरुप दिले आहे, असे प्रतिष्ठानने कळविले आहे.