रोटरीचे केंद्र पुन्हा सिव्हीलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:31+5:302021-03-13T04:30:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ज्येष्ठांना त्रास नको म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील केंद्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ज्येष्ठांना त्रास नको म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील केंद्र मायादेवी नगरात हलविण्यात आले होते. मात्र, आठवडाभरातच हे केंद्र पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातील दिव्यांग बोर्डाच्या ठिकाणी सुरू करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सूचना दिल्या आहेत.
हे केंद्र १५ मार्चपासून या ठिकाणी सुरू करायचे असल्याचे त्यादृष्टीने नियोजन करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जीएमसीत तिसऱ्या मजल्यावर हे केंद्र होते. मात्र, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे गेल्याच आठवड्यात हे केंद्र रोटरी भवनात हलविण्यात आले होते. सुरूवातीचे दोन दिवस याठिकाणी ज्येष्ठांची गर्दी उसळली होती. मात्र, हे केंद्र आता पुन्हा बदलविण्यात आले आहे. याबाबत जीएमसीच्या वैद्यकीय अधीक्षकांना डॉ. चव्हाण यांनी सूचना दिल्या आहेत.
८ हजार लोकांनी घेतली लस
नियमित होणाऱ्या लसीकरणामध्ये वाढत होत असून शुक्रवारी जिल्ह्यात ८३६८ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. आतापर्यंत ४९४२८ लोकांनी लस घेतली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी या केंद्रांमध्ये ५८३३ लोकांनी लस घेतली आहे.
यासह अनेक केंद्रांवर २०० पेक्षा अधिक लोकांनी लस घेतली आहे. शुक्रवारी ६७६ कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. ही संख्या ७७९९ वर पोहोचली आहे.