विमानतळावरील आपत्कालीन परिस्थितीत `रोजनबार` ठरणार बुस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:33+5:302020-12-06T04:17:33+5:30
जळगाव : विमानतळावर आगीसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव विमातळावर प्रशासनातर्फे नुकतेच ऑस्ट्रियातून संपूर्ण संगणकीय प्रणालीवर ...
जळगाव : विमानतळावर आगीसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव विमातळावर प्रशासनातर्फे नुकतेच ऑस्ट्रियातून संपूर्ण संगणकीय प्रणालीवर कार्य करणारे `रोजनबार` हे वाहन मागविले आहे. यामुळे जळगाव विमानतळावरील अग्निशमन यंत्रणा सक्षम झाली आहे.
जळगाव विमानतळावरून गेल्या वर्षभरापासून मुंबईची विमानसेवा सुरू झाली आहे. या सेवेला अहमदाबाददेखील जोडण्यात आले आहे. सुरूवातीपासून या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. तसेच विमानतळावरून पुण्याच्या सेवेसाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. यामुळे दळणवळण व पर्यटन वाढीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्रही मंजुर झाले आहे.
त्यामुळे विमानतळ प्रशासनाने विमानतळाच्या अंतर्गंत व बाहेरील सुरक्षेला अधिक महत्व दिले आहे. विमानतळावर विमान उतरतांना किंवा इतर कुठल्याही कारणाने आगीसारखी परिस्थिती उद्भवल्यास यावर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये किंमतीचे `एअर फिल्ड क्रश फायर टेंडर` मागविण्यात आले आहे. रोजनबार असे त्याचे नाव आहे. ऑस्ट्रियातून मुंबईपर्यंत जहाजाने व तेथून रस्तेमार्गाने हे जळगाव विमानतळावर दाखल झाले आहे. वाहनाचा वेग आणि त्याची क्षमता पाहता वेळीच घटनास्थळी पोहचणे शक्य होणार आहे. परिणामी आगीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
असे आहे रोजनबारची वैशिष्टये :
१) अत्यानुधिक संगणकीय प्रणालीवर ऑपरेट होणारे वाहन
२) एका मिनिटाला ७ हजार लीटर पाणी मारण्याची क्षमता
३) ८०० लीटर `फोम` क्षमता
४) २५० लीटर `डीसीपी` क्षमता
५) पॉवर डेकऑफ हायड्रोलिक ड्राईव्ह
६) ऑटोमेटिक फोम `फ्री मिक्सिंग` सिस्टीम