जळगावात गुलाबराव पाटील यांना पाठिंबा वाढला! रिपाइं कार्यकर्त्यांची समर्थनार्थ घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:01 PM2022-06-25T18:01:10+5:302022-06-25T18:02:12+5:30
राज्यात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे सरकार यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जळगाव: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याची दर्शवली आहे. यानंतर जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांना मिळत असलेला पाठिंबा वाढत चालल्याचे सांगितले जात असून, रिपाइंच्या नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रिपाइंचे कार्यकर्ते एकवटले होते. रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी येथील घराजवळ एकत्र येऊन त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. राज्यात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे सरकार यावे, अशी मागणी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवावेत
याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी लवकरच राज्यात परत येऊन स्थिर सरकार द्यावे, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशीही मागणीही रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी केली. मात्र, रिपाइंचे कार्यकर्ते अचानक गुलाबराव पाटलांच्या घराजवळ जमल्याने गोंधळ निर्माण झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्री गुलाबराव पाटलांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीयमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी गरज पडल्यास एकनाथ शिंदे यांच्या गटाला आम्ही पाठिंबा देऊ. त्यांच्या समर्थनासाठी आमचे कार्यकर्ते पुढे असतील, असे म्हटले होते.